शरद पवार भाकरी फिरवणार, जयंत पाटील नोव्हेंबरनंतर अध्यक्षपद सोडणार, राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
Sharad Pawar: मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असेन, असं सूचक वक्तव्य जयंत पाटलांनी केल्यानंतर आता राष्ट्रवादीचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? यावर चर्चा सुरू झाली आहे.
Jayant Patil On NCP Maharashtra President Post: मुंबई : मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असेन, नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, असं सूचक वक्तव्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केलं आहे. काल (सोमवारी) अहमदनगर (Ahmednagar) येथे झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटलांनी हे वक्तव्य केलं आहे. तसेच, त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना अप्रत्यक्ष चिमटा देखील काढला आहे. माझे प्रदेशाध्यक्षपदाचे महिने मोजू नका, काही तक्रार असल्यास शरद पवार (Sharad Pawar) यांना सांगा. असं जयंत पाटील म्हणाले आहेत. शरद पवारांना अनेकजण सोडून गेले, चिन्हही चोरलं, पण तुतारी चिन्हावर 8 खासदार निवडून आणले आहेत, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
विधानसभेत राष्ट्रवादी किती जागा लढवणार? जयंत पाटील म्हणाले...
पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला राज्यात 80 टक्के जागा मिळाल्या त्यामुळे आमचा महाराष्ट्रातील प्रयोग यशस्वी झाला, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे. तर लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाबाबत प्रचार झाला आणि देशातील संविधान बदलता येऊ नये यासाठी भाजपच्या राज्यातील जागा कमी झाल्या असं जयंत पाटील म्हणाले आहेत. सोबतच येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी नव्या चेहऱ्यांना संधी देईल असंही जयंत पाटील म्हणाले आहेत. तर राष्ट्रवादी किती जागा लढवणार? याबाबत बोलताना आम्ही मविआच्या बैठकीत हा निर्णय घेऊ, असं जयंत पाटील म्हणाले.
मिटकरींच्या डोक्यावर परिणाम झालाय : जयंत पाटील
काही दिवसांपूर्वी बोलताना जयंत पाटील लवकरच भाजपात प्रवेश करतील, असं अमोल मिटकरी यांनी म्हटले होतं. त्यावर बोलताना त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, अशी टीका पाटील यांनी मिटकरी यांच्यावर केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत 'पिपाणी' चिन्ह नसतं तर आमची साताऱ्याचीही एक जागा वाढली असती, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
"ही लढाई सोपी नव्हती. गेल्या एक वर्षात बरीच उलथापालथ झाली. स्वार्थापोटी अनेकांनी आपल्या पक्षाची साथ सोडली. लोकशाहीच्या मूल्यांनी रुजवलेल्या आपल्या पक्षाचे चिन्ह पळवले. शाब्दिक चिखलफेक केली गेली. मात्र पुरोगामी विचारांनी फुललेला आपला वटवृक्ष डगमगला नाही. तो आपल्यासारख्या निष्ठावंतांच्या साथीने अधिक बहरला." असं जयंत पाटील म्हणाले आहेत. पुढे बोलताना ते म्हणाले की, "लोकांनी निस्सीम विश्वास ठेवत आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना बळ दिलं. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपण विजयश्री मिळवला. आता संसदेत शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, महिला, युवक या सर्वांच्या प्रश्नांवर जाब विचारला जाईल. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला प्रत्येक खासदार आवाज उठवेल हा आम्हाला विश्वास आहे."
नोव्हेंबरनंतर जयंत पाटील अध्यक्षपद सोडणार, त्यानंतर धुरा कुणाच्या खांद्यावर?
मी आणखी चार महिने राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असेन, नोव्हेंबरनंतर पदावर नसणार, असं सूचक वक्तव्य जयंत पाटील यांनी कालच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना केलं आहे. त्यामुळे आता जंयत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडल्यानंतर पुढची धुरा कुणाच्या खांद्यावर सोपवली जाणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यामध्येही शरद पवार भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आता थोरल्या पवारांच्या राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.