इंदापूर : पुणे जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये इंदापूर तालुक्यात 60 ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. मात्र, निकालाच्या दिवसापासून ते थेट सरपंच निवडीपर्यंत राष्ट्रवादीचे राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे विरुद्ध भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील एकमेकांवर हल्ले काही थांबायला तयार नाहीत.
15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान झालं आणि 18 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. त्यावेळी 37 ग्रामपंचायत ह्या भाजप विचारांच्या असल्याचा दावा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला होता तर 36 ग्रामपंचायत ह्या राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याचा दावा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला होता. निवडणूक होऊन सरपंच आणि उपसरपंच विराजमान झाले तरी देखील हे दावे प्रतिदावे सुरूच आहेत.
38 ग्रामपंचायतींवर भारतीय जनता पक्षाचा सरपंच झाल्याचा दावा भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केलाय तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांमुळे इंदापूर तालुक्यातील तब्बल 42 ग्रामपंचायतींच्या सरपंच निवडीवर राज्यमंत्री भरणे यांनी दावा केलाय.
ग्रामपंचायतीवर सत्ता कोणाची?
यामुळे इंदापूर तालुक्यातील 60 ग्रामपंचायतींपैकी नेमक्या किती ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या व भारतीय जनता पक्षाच्या किती असा सवाल गावागावांमध्ये उपस्थित होत आहे. मात्र, राजकारणाच्या पायात हे दोन्ही आजी-माजी मंत्री आमच्याच ग्रामपंचायती जास्त असल्याचा दावा करून गावांचा विकास करणार असल्याचे सांगतायेत. 60 ग्रामपंचायतीवर सरपंच, उपसरपंच विराजमान झाले तरी आजी माजी मंत्री दावे प्रतिदावे करीत आहेत. नक्की कुणाच्या किती ग्रामपंचायतीवर निर्विवाद सत्ता आहे हे सांगणे मात्र कठीण होऊन बसले आहे.