सिंधुदुर्ग : केंदीय गृहमंत्री अमित शाह रविवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्घाटन कार्यक्रमाला आले होते. अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि उद्घाटनाच्या या फोटोसोबत गेले दोन दिवस सोशल मीडियात याच कॉलेजच्या उद्घाटनाचा आणखीन एक फोटो सध्या व्हायरल होत आहे. तो फोटो आहे 2018 मधील. नेमकं काय सत्य आहे, या फोटो मागील असा प्रश्न सध्या सर्वांनाच पडलेला आहे.


7 फेब्रुवारी 2020 ला नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचा एक फोटो या दुसऱ्या फोटोसोबत आहे. या फोटोत अमित शाह यांच्यासोबत, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, महाराष्ट्र राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री रवींद्र चव्हाण दिसत आहेत. तर दुसरा फोटो 27 मे 2018 मध्ये नारायण राणे यांच्यासोबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, जलसंधारण मंत्री राम शिंदे आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे दिसत आहेत. राणेंचे स्थानिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधीही उपस्थित आहेत.


सोशल मीडियातील व्हायरल होत असलेल्या दोन्ही फोटोतील बॅनरवरचा मजकूर लक्षवेधी ठरत आहे. पहिल्या फोटोतील बॅनरवर "लाइफईम हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय भव्य उद्घाटन सोहळा" असा मजकूर आहे. तर दुसऱ्या फोटोतील बॅनरवर "लाइफईम मेडिकल कॉलेज उद्घाटन सोहळा" असा मजकूर दिसून येत आहे. त्यामुळे सोशल मीडियातील बातम्यांमध्ये नारायण राणे यांनी आपल्याच पक्षाच्या गृहमंत्री अमित शाह यांची फसवणूक केली, असा मजकुर व्हायरल होत आहे. तसेच एकाच मेडिकल कॉलेजचे दोन वेळा उद्घाटन केले असा मजकूर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


दोन्ही फोटो मागील नेमकं सत्य काय आहे?
27 मे 2018 मध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जेव्हा उद्घाटन झाले होते तेव्हा राणेंच्या मेडिकल कॉलेजची इमारत बांधून पूर्ण झाली होती. या कॉलेजला मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाचे परवानगी मिळाली नव्हती. मात्र, हॉस्पिटल प्रत्यक्षात सुरु झाले होते. बॅनरवर "लाइफईम हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय भव्य उद्घाटन सोहळा" असा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात हॉस्पिटलचे उद्घाटन झाले होते. वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले नव्हते. मात्र, जानेवारी 2020 मध्ये राणेंच्या एसएसपीएम संस्थेच्या मेडिकल कॉलेजला मेडीकल कौन्सिल ऑफ इंडियाचे परवानगी पत्र मिळाले. यानंतर या कॉलेजच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली. 150 विद्यार्थ्यांचा पूर्ण कोटा भरून झाला. यावर्षीच्या शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते 7 फेब्रुवारी 2021 रोजी लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाचे रीतसर उद्घाटन झाले आहे.