परभणी : निवडणुका अनेक होतात मात्र ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखी निवडणूक नसते. या निवडणुकीत अनेक गट गावावर आपलं वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात. मात्र परभणीच्या पालम तालुक्यात तीन गावात निवडुन आलेल्या सर्व पॅनलपैकी एकही उमेदवाराला सरपंच होता येणार नाही.
ग्रामपंचायत निवडणुक झाली अनेक पॅनल निवडून आले,सरपंच पदाचे आरक्षण ही पडले तरी आता हे भांडण सुरु आहेत. परभणीच्या पालममधील फळा गावातील सत्ताधारी ग्रामविकास पॅनल अन पराभूत तिसऱ्या आघाडीतील हे भांडण आहे. या भांडणाचे कारणही अजबच आहे. गावात विविध आरक्षणानुसार 9 सदस्य निवडुन आले. मात्र सरपंच पदाचे आरक्षण पडले ते अनुसुचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी. निवडून आलेल्या 9 जणांपैकी एकही उमेदवार या प्रवर्गातील नाही. त्यामुळे मग सरपंच कोण होणार हा प्रश्न या नेत्यांसह गावकऱ्यांना पडला आहे. मागच्या 8 दिवसात मग कुणी म्हणतय पुन्हा निवडणूक घ्या, कुणी म्हणतय कोर्टात जाऊ तर कुणी म्हणतय जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घ्यावा..यातच गावातील राजकारण पुन्हा तापलं आहे.
परभणीच्या पालम तालुक्यातील एकुण 66 ग्राम पंचायतींच्या सरपंच पदासाठी 25 जानेवारी रोजी आरक्षण सोडत पार पडली. ज्यात पेठशिवणी, फळा आणि उक्कडगाव या तीन गावात अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षण पडले. मात्र या तीन्ही गावात या प्रवर्गातील महिला सदस्यच निवडून न आल्याने गावात सरपंच पदाच्या निवडीचा पेच निर्माण झाला आहे. निवडणुकीत पराभूत झालेल्या पॅनलला वाटतंय हे आरक्षण कायम राहावे. सत्ताधारी गटाला वाटतंय हे आरक्षण बदलून द्यावे. मात्र यात प्रशासनही हैराण झालाय नेमकं काय करायचं हे त्यांनाही कळत नसल्याने प्रशासनाने निवडणूक विभागाकडून मार्गदर्शक सूचना मागवल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे याबाबत ना जिल्हाधिकारी बोलत आहेत ना निवडणूक उपजिल्हाधिकारी काही बोलत नाही. त्यामुळे निवडणूक विभागाच्या सूचना आल्यानंतरच त्यानुसार पुढचा निर्णय घेतला जाणार आहे. म्हणून गावात नेमकं आता काय होणार यामुळे मतदारही चांगलाच संभ्रमात सापडला आहे.
मागचा पूर्ण महिना या तिन्ही गावातील प्रत्येक जण आपला माणुस निवडून आला पाहिजे, गावची सत्ता आपल्याच गटाच्या हातात यायला हवी म्हणून दिवसरात्र एक करून झटत होता. मात्र आरक्षणाच्या या पेचाने सर्वांच्याच मेहनतीवर पाणी फेरले आता जिल्हा प्रशासनाला निवडणूक विभाग काय सूचना करणार आणि गावात कोण सरपंच होणार हे प्रश्न या गावातील निवडून आलेल्या सदस्यांसह प्रत्येक गावकऱ्यांना झोप मात्र लागू देणार नाही.