बीड : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार आणि बीड (Beed) जिल्ह्यातील माजलगावचे नेते प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली असून आपला राजकीय वारसदारही जाहीर केला आहे. मात्र, या घोषणेनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि संस्थापक शरद पवार यांच्यावरच निशाणा साधला. राजकारणात मोठ्याने कुठे थांबायचं हे ठरवायला पाहिजे, शरद पवारांनी (Sharad pawar) सुद्धा वेळीच थांबायला पाहिजे होतं, असे आमदार सोळंके यांनी म्हटलं. आता, आमदार सोळंके यांच्या विधानावरुन राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पलटवार होण्याची शक्यता आहे. कारण, शरद पवारांची ओळख आजही 83 वर्षांचा तरुण म्हणून राष्ट्रवादीकडून करुन दिली जाते. तर, स्वत: शरद पवार हेही मी काय म्हातारा झालोय का, असे म्हणत महाराष्ट्र पिंजून काढत आहेत.
राज्यामध्ये चुलत्या पुतण्याच्या राजकारणामध्ये अनेक कुटुंब विभक्त झाल्याचे उदाहरण समोर असतानाच मागच्या चार ते पाच दशकापासून सक्रीय राजकारणात असलेल्या सोळंके कुटुंबाने मात्र वेगळा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी राजकीय निवृत्ती घेताना चक्क त्यांचा पुतण्या जयसिंह सोळंके हेच आगामी राजकीय वारसदार असतील अशी घोषणा देखील केली. या घोषणेनंतर प्रकाश सोळंके यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. त्यामध्ये, राजकीय निवृत्तीचं कारण देत शरद पवारांनाच टोला लगावल्याचं दिसून आलं.
मी पाच वर्षांपूर्वीच यापुढे जयसिंह सोळंके हेच पुढे राजकीय वारसा चालवतील असे जाहीर केले होते. राजकारणामध्ये मोठ्याने कुठे थांबायचं हे ठरवायला पाहिजे. पवार साहेब सुद्धा वेळीच थांबले असते तर त्यांच्या घरामध्ये जे घडलं ते घडलं नसतं असं मला वाटतं, असे म्हणत अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनाच सल्ला दिल्याचे दिसून येत आहे. तसेच, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे घडलं ते आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मी कधी बघितलं नव्हतं. मात्र, आता येणाऱ्या काळामध्ये लोकसभेत जे घडलं ते विधानसभेला घडणार नाही. मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली असली तरी मी सगळ्या यंत्रणेमध्ये असणार आहे. मला दोन मुले आहेत, मात्र त्यांना राजकारणामध्ये इंटरेस्ट नाही. मुलीला देखील नाही, म्हणूनच राजकीय वारस म्हणून चॉईस हा माझा पुतण्या जयसिंह हाच होता, असे स्पष्टीकरण आमदार सोळंके यांनी दिले.
कोण आहेत जयसिंह सोळंके
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांचे लहान बंधू धैर्यशील सोळंके यांचे जयसिंह सोळंके हे चिरंजीव आहेत. म्हणजेच, प्रकाश सोळंके यांचे पुतणे. जयसिंह सोळंके धारूर पंचायत समितीचे उपसभापती राहिलेले आहेत. त्यासोबतच बीड जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष म्हणून जयसिंह सोळंके यांनी यापूर्वी काम पाहिलं होतं. आता जयसिंह सोळंके हेच प्रकाश सोळंके यांचे वारसदार म्हणून आगामी विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंची राजकीय निवृत्ती; वारसदार म्हणून घोषणा केलेले जयसिंह सोळंके कोण?