Prakash Ambedkar: मनोज जरांगे यांच्या ओबीसीतून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीमुळे विधानसभेच्या निवडणूकीपूर्वी दाेन तट पडले असल्याचं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी केलंय. राजकीय भांडण सामाजिक करण्याचे अनेकांचे मनसुबे या यात्रेतून उद्ध्वस्त झाल्याचं ते म्हणालेत. अमरावतीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद आता चांगलाच तापल्याचे दिसत असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांसह मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यांत आरोप- प्रत्यारोपांचा खेळ सुरु आहे. दरम्यान, मनोज जरांगेच्या मागणीमुळे विधानसभेपूर्वी दोन तट पडल्याचं वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलंय.
जरांगेच्या मागणीमुळं दोन तट
मराठवाड्यात सत्तांतरासाठी नामांतराची अवस्था आहे या वक्तव्यावर तसेच शरद पवारांनी महाराष्ट्राचं मणिपूर होईल असं वक्तव्य केलं. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रत्यूत्तर दिलंय. ते म्हणाले, मनोज जरांगेंची जी ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी आहे, त्यामुळे दोन तट पडले आहेत. राजकीय भांडणाचं सामाजिक भांडणात रुपांतर करण्याचे अनेकांचे मनसुबे ओबीसी आरक्षणाच्या यात्रेतून उध्वस्त झाले असल्याचं ते म्हणाले.
ओबीसींना आरक्षण जातंय अशी जाणीव
विधानसभेच्या निवडणूकीच्या आगोदर मराठा आणि ओबीसी असे दोन तट पडले आहेत. हे राजकीय भांडण निवडणूकीपर्यंत चालेल, असे मी म्हणालो होतो. ओबीसी मराठ्यांना मतदान करणार नाही आणि मराठे ओबीसींना मतदान करणार नाहीत. ओबीसींमध्ये ही नव्यानं आलेली जागृती आली आहे. आपलं आरक्षण जातंय ही जाणीव झाली आहे. यामुळे दोन तट असले तरी हे आपलं राजकीय भांडण असल्याची भूमिका असल्याचं आंबेडकरांनी सांगितलं.
बच्चू कडू तिसऱ्या आघाडीच्या तयारीत?
बच्चू कडू तिसऱ्या आघाडीच्या तयारीत आहे यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ज्याचं काही अस्तित्व नाही त्यावर मी कमेंट करणार नाही. असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी नाही, तर शेतकऱ्यांची आघाडी असणार, अशी घोषणा सध्या शिंदेंसोबत असलेल्या बच्चू कडू यांनी केली होती. तसेच, येत्या 9 ऑगस्टला सभेत भूमिका स्पष्ट करणार असल्याचीही त्यांनी सांगितले होते. त्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनाही बच्चू कडू यांनी शेतकरी आघाडीत येण्यासाठी खुलं आमंत्रण दिलं होतं.
कुणबी मराठा आमदार धनगर, माळ्यांसोबत नाही
"कुणबी मराठ्यांपासून सावध राहा. आताचं जे सभागृह आहे, त्यामध्ये 190 कुणबी समाजाचे आमदार आहेत. फक्त 11 आमदार हे ओबीसी समजाचे आहेत. कुणबी हा स्वत:ला ओबीसी म्हणत असला तरी तो सभागृहात मी मराठ्यांसोबत आहे, असे सांगतो. तो धनगरांसोबत नाही, तो माळ्यांसोबत नाही, तो वंजारी, लिंगायत, बंजारा यांच्यासोबत नाही. तो तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सोनार यांच्यासोबत तर अजिबातच नाही," असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हेही वाचा: