सोलापूर: राज्य सहकारी शिखर बँकेने विठ्ठल सहकारी कारखाना सील केल्यानंतर कोंडीत सापडलेल्या अभिजीत पाटील यांनी सोमवारी सोलापूरमधील एका हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत पाटील यांनी, मी कारखाना वाचवण्यासाठी कुठेही जायला तयार असल्याचे सांगितले. अभिजीत पाटील (Abhijeet Patil) हे शरद पवार यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जातात. मात्र, शिखर बँकेने ते अध्यक्ष असलेल्या विठ्ठल सहकारी कारखान्यावर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर त्यांना नाईलाजाने भाजपमध्ये जावे लागेल, अशी चर्चा सुरु झाली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि अभिजीत पाटील यांच्या आजच्या भेटीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.


देवेंद्र फडणवीस यांच्याशी आपली सकारात्मक चर्चा झाल्याचे अभिजीत पाटील यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तुम्ही भाजपमध्ये जाणार का, असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील यांनी म्हटले की, मी भाजपमध्ये जाण्याच्यादृष्टीने आज कोणतीही चर्चा झाली नाही. आजच्या भेटीत कारखान्याला मदत आवश्यक आहे, कारखान्याचं सील काढून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. साहजिकच या मोबदल्यात त्यांचीही काहीतरी अपेक्षा असेल. ते आपल्याला आऊट ऑफ द वे जाऊन मदत करत आहेत, मग आम्हीही त्यांची मदत करणे, ही स्वाभाविक अपेक्षा आहे. आज मी त्यांना शेतकरी सभासदांसाठी जे करायची गरज आहे, ते करायची तयारी आहे, असे त्यांना सांगितले. आता ते मला काय मदत करता येईल, याबद्दल सांगणार आहेत. तसेच कारखान्याला कशाप्रकारे मदत करता येईल, याबद्दल ते मला सांगणार आहेत, अशी माहिती अभिजीत पाटील यांनी दिली. मी त्यांना म्हणालो की, लवकरात लवकर कारखान्याचे सील काढावे. जेणेकरुन शेतकऱ्यांना काहीतरी बोलता येईल, असेही अभिजीत पाटील यांनी सांगितले. 


मी शरद पवार आणि जयंत पाटलांशी चर्चा केलेय: अभिजीत पाटील


मी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला येण्यापूर्वी कारखान्याच्या सभासदांशी चर्चा केली होती. सभासदांना याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की, कारखाना वाचवण्यासाठी तुम्ही कुठेही जा. काहीही निर्णय घ्या. मी त्या सर्वांना विचारुनच फडणवीसांना भेटायला आलो. मी शरद पवार साहेब आणि जयंत पाटील यांच्याशीही चर्चा केली. पण न्यायालयाने स्थगिती उठवल्यामुळे आमच्याकडे पर्याय नव्हता. त्यामुळे मायबाप सरकारकडे विनंती करणे हे माझे कर्तव्य होते. त्यामुळे मी सरकारमधील उपमुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीसांना भेटलो. त्यांनी मदतीसाठी सकारात्मक भूमिका घेतल्याचे अभिजीत पाटील यांनी सांगितले. 


आणखी वाचा


माढ्यातील मोदींच्या सभेपूर्वी फडणवीसांचा डबल धमाका, शरद पवारांच्या मर्जीतील नेत्याला गळाला लावलं