Sanjay Raut : अजित पवारांची (Ajit Pawar) ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात, अशी जोरदार टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे. तसेच संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावरही निशाणा साधला आहे. नाशिक (Nashik) येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
संजय राऊत म्हणाले की, नरेंद मोदी आणि अमित शाह यांना महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. त्यांनी दोन्ही पक्ष फोडले. त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. एवढे खोटे बोलणारा पंतप्रधान बघितला नाही. त्यासाठी ऑलिम्पिकमध्ये एखादा खेळ बघावा लागेल. दिवा विझतो तसा तो मोठा होता. तसे पंतप्रधान आहेत.
मोदींनी आधी अजित पवार यांच्यावर कारवाई करावी
मोदींना माझा सवाल आहे, तुम्ही आमचे बारा लोकं घेतले आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्यावर कारवाई करा. मोदी यांची भ्रष्टाचार विरोधीची बॉम्ब नसून पोकळ बांग आहे. सगळे भ्रष्टाचारी आपल्या मांडीवर घेऊन मोदी भ्रष्टाचार विरोधी लढाई करत आहेत. मोदींनी आधी अजित पवार यांच्यावर कारवाई करावी, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तुम्ही अपघाताने मोठे झालेले नेते आहात. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचे योगदान काय आहे? असा सवालही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर
अजित पवार यांनी 2019 साली शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले म्हणूनच भाजपसोबत गेलो होतो, असे म्हटले आहे. यावर संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, हे अजून किती वेळा बोलणार, गुळगुळीत झाले आहे आता. आता दुसरे काहीतरी बोला. धमकी वगेरे द्या. अजित पवारांची ख्याती सध्या धमकी बहाद्दर अशी झाली आहे. रोज उठून ते सध्या मतदारसंघात 10 लोकांना धमक्या देतात. हे असे वैचारिक वक्तव्य तुम्हाला शोभत नाहीत. अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.
महाराष्ट्रातील जनतेने याची नोंद घेतलीय
अमित शाह यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. आम्ही ओबीसी आरक्षण रद्द करू असे त्यांनी जाहीररीत्या सांगितले आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील जनतेने याची नोंद घेतली आहे, इतकेच मी सांगतो असे ते यावेळी म्हणाले.
नाशिकमध्ये आम्हाला समोर गद्दारच हवा, त्यांना आम्ही गाडणारच
दरम्यान, नाशिक लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) हे आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. याबाबत संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीला शक्तिप्रदर्शन करावे लागत नाही. नाशिक आणि दिंडोरी दोन्ही जागा महाविकास आघाडी प्रचंड मताधिक्याने निवडून येतील. राजाभाऊ समोर महायुतीला उमेदवारच मिळत नाही. नाशिकमध्ये आम्हाला समोर गद्दारच हवा आहे. त्यांना आम्ही गाडणारच, असे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले आहे. तसेच, नाशिकचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांना संजय राऊतांच्या हस्ते एबी फॉर्म देण्यात आला.
आणखी वाचा
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना बाजूला करुन सत्ता स्थापनेसाठी बैठका; राजू वाघमारेंचा खळबळजनक दावा