गजानन कीर्तिकरांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालीय, त्यांची पक्षातून हकालपट्टी करा; शिशिर शिंदे कडाडले
खासदार गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे (Shinde Group) नेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी केली आहे.
Shishir Shinde on Gajanan Kirtikar : मुंबई : ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन कीर्तिकर (Gajanan Kirtikar) यांनी आपल्या मनातली खंत बोलून दाखवली आहे. मात्र, यामुळे आता त्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. खासदार गजानन कीर्तिकरांची हकालपट्टी करा, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे (Shinde Group) नेते शिशिर शिंदे (Shishir Shinde) यांनी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शिशिर शिंदेंनी एकनाथ शिंदेंकडे केली आहे.
शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून गजानन कीर्तिकर यांनी पक्षविरोधी वक्तव्यं केल्याप्रकरणी त्वरीत शिवसेनेतून हकालपट्टी करावी आणि त्यांना ताबडतोब निरोपाचा नारळ द्यावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात एक पत्र शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलं आहे.
शिशिर शिंदे यांनी त्यांच्या पत्रा म्हटलंय की, "लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी आणि त्यांच्या पत्नीनं पक्षविरोधी वक्तव्यं करून विरोधी पक्ष ठाकरे गटाची बाजू घेतली आहे. त्यामुळे 'मातोश्रीचे लाचार श्री' होणाऱ्यांना पक्षातून त्वरीत बाहेरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांना ठाकरे गटानं उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांनतर अमोल कीर्तिकर हे गजानन कीर्तिकर यांच्याच कार्यालयातून कारभार करत होते. तसेच, गजानन कीर्तिकर शिवसेनेत असतानाही त्यांचा खासदार निधी अमोल कीर्तिकर यांनी स्वत:च्या प्रचारासाठी आणि विकासकामांसाठी वापरला. त्यामुळे त्यांचा शिवसेना पक्षाला शून्य लाभ झाला. मात्र, फायदा ठाकरे गटाला झाला. परवा मतदानाच्या दिवशी गजानन कीर्तिकर यांच्या पत्नीनं मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरे गटाची बाजू घेतली होती. गजानन कीर्तिकर यांना मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई झालेली आहे. गजानन कीर्तिकर यांचे हे उद्योग पक्षाला बदनाम करत आहेत. त्यामुळे आता गजानन कीर्तीकर यांची पक्षातून त्वरीत हकालपट्टी करावी आणि त्यांना निरोपाचा नारळ द्यावा, अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी शिवसेना मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून केली आहे.
काय म्हणालेले गजानन कीर्तिकर?
लोकसभेची ही निवडणूक अटीतटीची आहे, कारण दोन पक्ष फुटल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. खासदार निवडून येतील, मात्र यामध्ये खरा कोण हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. लोकांचं जनमत कोणाच्या बाजूने हे निवडणुकीतून दिसेल, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले. दीड-दोन वर्षांपूर्वी मी शिंदेंच्या शिवसेनेत गेलो, त्यावेळेला माझे कुटुंबीय विरोध करत होते, पण मी वेगळं मत मांडलं आणि एकटा पडलो. आज मुलासोबत टर्निंग पॉईंटला मी सोबत नव्हतो, याची खंत वाटते, असे म्हणत गजानन कीर्तिकरांनी मनातील खंत बोलून दाखवत पुत्रप्रेमाचा दाखला दिला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत माझा फायदा खरं म्हणजे रवींद्र वायकरला मिळाला पाहिजे. मी या निवडणुकीत अमोल किंवा रवींद्र वायकर यांच्या विरोधात भूमिका मांडली नाही, असेही कीर्तिकरांनी म्हटलं आहे.