Navratri 2022 : दसरा मेळाव्यासोबतच नवरात्रीसाठीही (Navratri) राजकीय पक्षांमध्ये जोरदार चढाओढ बघायला मिळत आहे. नवरात्र उत्सव मंडळांना राजकीय पक्षांकडून भरभक्कम देणग्या दिल्या जात आहेत. अक्षरश: कोट्यवधींची उलाढाल देणग्यांच्या माध्यमातून होत आहे. आगामी निवडणुकांकरता दहीहंडी, गणेशोत्सव आणि नवरात्र हे सण राजकीय पक्षांसाठी मतेबांधणीसाठी महत्त्वाचे ठरत आहेत.


यंदाच्या वर्षी दहीहंडी उत्सवापासूनच प्रत्येक सण-उत्सवात आपली छाप पाडण्याकरता राजकीय नेते आणि पक्षांमध्ये चढाओढ सुरु आहे. शिवसेनेचा शिंदे गट, ठाकरे गट, भाजप, मनसे हे चार पक्ष आणि कार्यकर्ते मंडळांच्या माध्यमातून वोट बँक पक्की करण्याच्या प्रयत्नात आहेत. सर्वच पक्ष देणग्या देत आहेत. दोन वर्षांनंतर संधी असल्याने जल्लोषात उत्सव साजरा होणार आहे.


वरळी, परळ, काळबादेवी या मराठीबहुल भागात आणि विशेषत: शिवसेनेचे बालेकिल्ले असलेल्या ठिकाणी शिंदे गट आणि भाजपने अनेक मंडळांचं प्रायोजकत्व घेतलं आहे. वरळी, परळ भागात शिंदे गटाने तर काळबादेवीत विशेषत: मराठी मतांना आकर्षित करण्याकरता भाजपकडून मराठी दांडियाचे आयोजन करण्यात आलं आहे.


नवरात्र मंडळांचे यंदाचे रेट कार्ड काय? 


- मंडळाच्या गेटवरील जाहिरातबाजी - दीड ते दोन लाख 


- मोठे फ्लेक्स- 5 ते 7 लाख 


- लहान बॅनर - 25 हजारापासून 50 हजारांपर्यंत 


- प्रवेशद्वाराच्या आत प्रवेश केल्यावर मंडपाच्या शेजारी छोट्या जाहिराती 3 ते 5 हजार रुपये 


- टी शर्ट - 250 ते 500 रुपये प्रत्येकी 


- रोजच्या आरतीचे प्रायोजकत्व - 5 लाखांपासून पुढे 


- 9 दिवसांकरता गरबा महोत्सवाच्या आयोजनाचा खर्च कोट्यवधींच्या घरात 


डोळे पांढरे करणारे नवरात्रीतल्या देणग्यांचे हे आकडे गणेशोत्सवापेक्षाही मोठे आहेत. उपनगरातही नवरात्रीचा मोठा जल्लोष असतो. यंदा मुंबई शहरातील मराठीबहुल भागातही मोठ्या प्रमाणात गरबा उत्सव साजरे होताना दिसतील.


पश्चिम उपनगरातील सर्वात मोठे गरबा महोत्सव फाल्गुनी पाठक, किंजल दवे, प्रिती पिंकी या सेलिब्रिटींमुळे ओळखले जातात. इथे दररोज दहा हजारांपर्यंत दांडिया खेळण्याकरता गर्दी होते. या तीनही महोत्सवाचं प्रायोजकत्व भाजपच्या नेत्यांनी घेतलं आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Eknath Shinde Banner : गणेशोत्सवानंतर नवरात्रोत्सवातही आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर


Navratri 2022 : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरूवात! ठिकठिकाणी देवीचे आगमन, जाणून घ्या घटस्थापना पूजा विधी, मुहूर्त आणि मंत्र