NCP Meeting : सोलापुरातील (Solapur) अंतर्गत वादाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या वादांमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी तातडीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. सोलापूर शहरातील अंतर्गत वाद, माजी महापौरांवरील लैंगिक शोषणाचा आरोप आणि महिला जिल्हाध्यक्षाची पदावरुन गच्छंती या विषयांवर बैठकीत चर्चा होणार आहे.


माजी महापौरांवर लैंगिक शोषणाचा गुन्हा
शिक्षण संस्थेतल्या शिक्षिकेसोबत जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अनेक वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर 24 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. सोलापुरातल्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खंडणी आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिला ही मनोहर सपाटे यांच्या संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत होती. पीडिता ही विधवा असल्याने सपाटे यांनी तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवत शारीरिक संबंध ठेवले. तिने विरोध केल्यानंतर तुला संस्थेतून काढून टाकेन, तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करेन अशी धमकी दिल्याचा आरोप पीडितीचा आहे. पीडितेने याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिला आरोपी सपाटे यांनी गावठी बंदूक दाखवत भावाला आणि त्यांनाही जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील पीडित महिलेने केला आहे.


महिला आघाडी जिल्हाध्यक्षाची गच्छंती
21 सप्टेंबर रोजी सुप्रिया गुंड-पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पदावरुन गच्छंती करण्यात आली. आता सोलापुरात या पदावरुन नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सोलापूर महिला जिल्हाध्यक्षपदी सुवर्णा शिवपुरे आणि महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी सुवर्णा झाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडींवर राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून येत आहे. आपल्याबाबतीत चुकीचा अहवाल पाठवण्यात आला. तसेच नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दलची माहिती समाज माध्यमातूनच मिळाली. या संदर्भात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आपण तक्रार करणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा सुप्रिया गुंड-पाटील यांनी दिली.


इतर महत्त्वाच्या बातम्या


राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात सगळे बोलले, अजित पवारांना संधी का नाही?


'गृहमंत्रीपद पाहिजे होतं पण वरिष्ठांनी...'; अजित पवारांनी मनातली खदखद स्पष्टच बोलून दाखवली