तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
भाजपने 400 पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते, असे वक्तव्य आमदार राजा सिंह यांनी भिंवडीतील संमेलनात केले होते
![तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने Even if you have crossed 500...; Amol Mitkari's counterattack from T Raja's statement of hindu, NCP-BJP face to face तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/a06f9b35e07aa786fccb0bb6d059b0bc17185279278111002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला : तेलंगणातील भाजप आमदार आणि हिंदू धर्माचे प्रचारक आमदार टी. राजा यांचा भिवंडीतील दौरा अगोदरच वादग्रस्त ठरला होता. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी टी. राजा यांच्या भाषणाला परवानगी न देण्याची मागणी केली होती. मात्र, तरीही भिवंडीत त्यांचा नियोजित कार्यक्रम पार पडला. यावेळी, केलेल्या भाषणातून त्यांनी पु्न्हा एकदा 400 पारच्या नाऱ्यावर भाष्य केलं. भाजपने 400 पारचा नारा दिला, त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला असा दावा महायुतील सहकारी पक्षांच्या काही नेत्यांनी केला आहे. त्यात, आता टी राजा यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. आमदार टी. राजासिंह यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पलटवार केला आहे.
भाजपने 400 पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते, असे वक्तव्य आमदार राजा सिंह यांनी भिंवडीतील संमेलनात केले होते. त्यावर, आता अमोल मिटकरी यांनी पलटवार करत, तुम्ही 500 पार जरी केलं असतं, तरी हे हिंदू किंवा इस्लाम राष्ट्र होणार नाही, असे म्हटले आहे. ''टी राजा या एका व्यक्तीने 400 पार गेलो असतो तर हे हिंदूराष्ट्र झालं असतं, असा अजब दावा केला आहे. कदाचित टी. राजाला हे माहिती नसावं की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान दिलं. या संविधानाच्या चौकटीत राहून या देशाचं नाव भारत म्हणजे स्वतंत्र भारत राष्ट्र हेच नाव देण्यात आलं आहे. 400 पार नाही, तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी या देशाला हिंदूराष्ट्र कोणीही घोषित करू शकत नाही,'' असे म्हणत अमोल मिटकरी यांनी टी राजा यांच्या भाषणानंतर पलटवार केला आहे.
टी. राजा ला या देशात लोकशाही नांदते व या देशाला संविधान आहे हे कदाचित माहीत नसावं! हा अखंड भारत आहे व तो अखंड भारत राहील! "ग्लानिर्भवती " "भारत" हा कृष्णाचा उपदेशसुद्धा टी राजा विसरला असावा.#भारतराष्ट्र
— आ. अमोल गोदावरी रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 16, 2024
''हिंदू धर्मामध्ये ज्या भगवान श्रीकृष्णाला आपण मानता. त्या भगवान श्रीकृष्णाने यदा यदा ही धर्मस्य, "ग्लानिर्भवती " "भारत" असा उपदेश दिला आहे. टी. राजाचा अभ्यास थोडा कमी आहे, त्यांनी अभ्यास करावा. कोणाचीही सत्ता आली तरी हा देश भारत राष्ट्र राहणार आहे, हिंदू राष्ट्र किंवा इस्लाम राष्ट्र होऊ शकणार नाही,'' असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.
पंतप्रधानांनी वक्फ बोर्ड रद्द करावा
भिवंडी तालुक्यातील पडघा येथे संत संमेलन व हिंदू धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रक्षोभक वक्तव्य करण्यामुळे चर्चेत असणारे भाजपचे आमदार टी राजा सिंह हे उपस्थित होते. या धर्मसभेत बोलताना त्यांनी वक्फ बोर्ड रद्द करावा, अशी मागणी केली. महाराष्ट्रात 1 लाख एकर जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे. भारतात 10 लाख एकर जमीन वक्फ बोर्डकडे आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी वक्फ बोर्ड कायदा संपवून टाकावा. वक्फ बोर्डाच्या जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालये, क्रीडांगण, महाविद्यालये, घरे बनवावीत असे आवाहनही टी राजा सिंह यांनी केले. तसेच या लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पेक्षा अधिक जागा जिंकल्या असत्या तर भारत हिंदू राष्ट्र झाले असते, असेही टी राजा सिंह म्हणाले.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)