छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्राच्या मराठवाड्यातील प्रमुख लढत असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये (Sambhajinagar) यंदा शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला आहे. गत निवडणुकीत येथील शिवसेना उमेदवार चंद्रकांत खैरेंना (Chandrakant Khaire) पराभवाचा सामना करावा लागला होता. एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी विजय मिळवत सर्वांना धक्का दिला. मात्र, यंदाही संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होत असून संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) विरुद्ध चंद्रकांत खैरे यांच्यात फाईट असल्याचं दिसून येत आहे. मात्र, या दोन्ही उमेदवारांना इम्तियाज जलील यांचंही आव्हान असणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीत संदीपान भुमरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी, मुख्यमंत्री शिंदेंनी उबाठा म्हणत उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार हल्लाबोल केला. तसेच, लाव रे तो व्हिडिओचा कार्यक्रमही सभेत दाखवला.


यंदाची निवडणूक देशाच्या विकासाची, प्रगतीची आणि नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याची आहे. बाळासाहेब ठाकरेंची घोषणा होती, गर्व से कहो हम हिंदू है. अबकी बार चारसो पारमध्ये संदीपान भुमरे पहिले हवेत अशी अपेक्षा असल्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं. यावेळी, त्यांनी उबाठा म्हणत उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. सर्वात फास्ट रंग बदलणारा सरडा अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तसेच, लाव रे तो व्हिडिओ म्हणत एकनाथ शिंदेनी भरसभेत उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ दाखवला. ज्यामध्ये, उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत, काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. जे उबाठा मोदींच गुणगान गात होते, ते मी तुम्हाला ऐकवतो, असे म्हणत व्हिडिओ दाखवला. या व्हिडिओनंतर, सरड्यापेक्षा फास्ट रंग बदलणारा अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. आता, बघितलं का तुम्ही, नरेंद्र मोदींच्या नावाने खडे फोडणारे कोण, सरडे रंग बदलतात पण एवढ्या फास्ट. बाप एक नंबरी, बेटा 10 नंबरी, असेही शिंदेंनी येथील सभेत म्हटले. . 






पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 80 कोटी गरिबांना मोफत रेशन देण्यात येत आहे. त्यात फक्त हिंदू आहेत का? असा सवाल शिंदेंनी केला. आम्हाला काहीजण मिंधे म्हणतात, नीच म्हणतात, खालच्या भाषेत टीका करतात मात्र हे तुम्हाला पसंत आहे का? सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे सहन होत नसल्याने मला शिवी देण्याचे प्रकार सुरु आहेत. हा माझा नव्हे तर शेतकरी, कष्टकरी, माता भगिनींचा अपमान आहे. युतीमध्ये असताना उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे गुणगान गात होते. आता मोदीजींच्या नावाने खडे फोडत आहेत, एवढ्या झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिला असल्याची टीका करताना उद्धव यांची व्हिडीओ क्लिपच मतदारांना दाखवली.


हेही वाचा


नाशिकमध्ये नवा ट्विस्ट, ना भुजबळ, ना गोडसे; दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच उमेदवारीचा लाभ !