नाशिक : महायुतीच्या जागावाटपाचा काही जागांवरील तिढा अद्यापही कायम असून नाशिकमधून कोणाला जागा मिळणार, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाशिक (Nashik) ही शिवसेनेची हक्काची जागा असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही (NCP) या जागेवर दावा केला असून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना येथून उमेदवारी देण्याची तयारी सुरु आहे. मात्र, आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं होतं. उमेदवारी जाहीर करण्यास होत असलेल्या विलंबामुळे आपण उमेदवारीचा दावा सोडत असल्याचंही भुजबळ यांनी म्हटलं होतं. आता, आजपासून नाशिक लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अद्यापही महायुतीचा उमेदवार निश्चित नसल्याने सर्वांच्या नजरा उमेदवारीच्या घोषणेकडे लागल्या आहेत. त्यामुळे, आजच घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे नाव आता पुढे आले आहे. माणिकराव कोकाटे सिन्नरचे आमदार असून त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या मैदानात उतरवले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेचे नेते आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसें आपली उमेदवारी पक्की समजत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे, नाशिकच्या जागेवरुन महायुतीत अजूनही संघर्ष सुरूच असल्याचे दिसून येते.
काय म्हणाले कोकाटे
माणिकराव कोकाटे यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला असता, पक्षाने जबाबदारी दिल्यास निवडणूक लढणार आणि जिंकणार, असे कोकाटे यांनी म्हटले. तसेच, महाविकास आघाडीकडून देण्यात आलेला उमेदवार सिन्नरचा आहे, माझ्या उमेदवारीने सिन्नरच्या मतांमध्ये उभी फूट पडणार असून राजाभाऊ वाजेंपेक्षा जास्त मत मला मिळणार, असा दावा कोकाटे यांनी केला आहे. अजित पवार याच्याशी बोलणे झाले. मात्र, त्यांनी शेवटच्या टप्प्यात निवडणूक होणार असल्याने उशिरा उमेदवार जाहीर होणार असल्याचे सांगितले. छगन भुजबळ यांनी माघार का घेतली याबाबत माहिती नाही, ते लढणार म्हणून आम्ही शांत होतो. मी यश अपयशाला घाबरत नाही, मैदान सोडून जात नाही, असेही माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, नाशिकच्या जागेवरील महायुतीतमधील वादाचा पेच अद्याप कायम आहे.
नाशिकमध्ये 20 मे रोजी मतदान
नाशिक लोकसभा मतदारसंघ व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीत अर्जविक्री व दाखल करता येणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत 3 मेपर्यंत आहे. लोकसभा निवडणुकीत पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी मतदान घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. निवडणुकीकरिता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा मुख्यालयाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.