बीड : महाविकास आघाडी (MVA) म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार (NCP SP) पक्षाचे बीड लोकसभेचे (Beed Lok Sabha Seat) उमेदवार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांनी वडवणी तालुक्यातल्या कोठारबन येथे प्रचार सभा घेतली.  या प्रचार सभेत बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. धनंजय मुंडे फोनवर लोकांना एकेरी भाषेत कशा शिव्या देतात याच्या माझ्याकडे चार कॅसेट आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यावर टीका करू नये अन्यथा मी निवडणूक आयोगाकडे या कॅसेट सादर करील, असा थेट इशारा बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांना दिला आहे. 


धनंजय मुंडे मला बहुरंगी म्हणतात मात्र त्यांचाच बहुरंगीपणा संपूर्ण महाराष्ट्राने बघितला आहे. मी रंगात रंग मिसळणारा बजरंग असून दोन्ही बहीण भावाने माझ्यावर टीका करण्यापेक्षा बीड जिल्ह्याच्या विकासावर बोलावं, असं सोनवणे म्हणाले. प्रीतम मुंडे यांनी संसदेत मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली नाही. आरक्षणाच्या प्रश्नावरून संसदेत त्या कधीच बोलल्या नाहीत.  दहा वर्ष खासदार असताना बीड जिल्ह्यात कोणता मोठा प्रकल्प आणला हे त्यांनी सांगावं, अशा शब्दात बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यासह प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर देखील टीका केली. 


बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेत पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की मी प्रीतम मुंडेंना नाशिक मधून निवडणुकीत उभं करेल मात्र प्रीतम मुंडे यांना तिकीट देण्याचा अधिकार पंकजा मुंडे यांना आहे का असा देखील प्रश्न बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे.   


धनंजय मुंडे यांची राजकीय उंची अनैतिक : बजरंग सोनवणे 


राजकारणामध्ये माझी उंची आणि लायकी काढली जाते. मात्र, माझी उंची नैतिक आहे तर धनंजय मुंडे यांची उंची अनैतिक आहे असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं.  मी तीस वर्षांपासून राजकारणात आहे तर तुम्ही फक्त पंधरा वर्षापासून राजकारणात आलात, असं देखील सोनवणे यांनी म्हटलं. 
 
दिल्ली ते गल्लीपर्यंत दहा वर्षापासून तुमची सत्ता होती. तुम्ही जिल्ह्याच्या विकासासाठी काय केलं, असा सवाल बजरंग सोनवणे यांनी केला. बीड जिल्ह्यात पाणी आणणार असं तुम्ही म्हणता मात्र ते पाणी अद्यापही आलेलं नाही.  शेतकऱ्यांच्या शेतमालाला अद्यापही पुरेसा भाव मिळत नाही आणि हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठीच मला संसदेत निवडून जायचं आहे त्यामुळे कोणावर टीका करण्यापेक्षा विकासाचं राजकारण जिल्ह्यात झालं पाहिजे, असं बजरंग सोनवणे म्हणाले.  


संबंधित बातम्या : 


नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात, महायुतीत तिढा कायम असतानाच भुजबळांच्या कट्टर समर्थकाने घेतला अर्ज


 Dindori Lok Sabha : दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, नाराज जे पी गावित आज भरणार उमेदवारी अर्ज