''काहीही करा जमीन विकू नका''; शरद पवारांचा गावकऱ्यांना मोलाचा सल्ला, मोदींसह अजित दादांवर शाब्दीक हल्ला
तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आज बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावात जाऊन ग्रामस्थांनी संवाद साधला.
![''काहीही करा जमीन विकू नका''; शरद पवारांचा गावकऱ्यांना मोलाचा सल्ला, मोदींसह अजित दादांवर शाब्दीक हल्ला ``Do not sell the land of farm''; Sharad Pawar's valuable advice to villagers, verbal attack on Narendra Modi from baramati ''काहीही करा जमीन विकू नका''; शरद पवारांचा गावकऱ्यांना मोलाचा सल्ला, मोदींसह अजित दादांवर शाब्दीक हल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/20/547427726d096f3bad90d3b7ddbce32217188843063651002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वा आणि खासदार शरदचंद्र पवार गेल्या 3 दिवसांपासून बारामती (Baramati) दौऱ्यावर आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक गावात दौरे करुन येथील जनतेचे आभार मानत आहेत. तसेच, गेल्या 57 वर्षांपासून येथील जनता माझ्या पाठिशी आहे, त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही मला चिंता नव्हती. लोकं समोर येऊन बोलत नव्हते, पण दमदाटीच्या भाषणाला उत्तर देताना मतपेटीतून त्यांनी सर्वकाही दाखवून दिलं, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांवरही (Ajit Pawar) नाव न घेता हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे शरद पवाराचं (Sharad Pawar) मूळ गाव असलेल्या काटेवाडीतही त्यांनी सभा घेतली. यावेळी, काटेवाडीकरांनी मोदींना चमत्कार दाखवला, असेही पवारांनी म्हटले. त्यानंतर, आज लोणी भापकर गावातून ग्रामस्थांना मोलाचा, वडिलकीचा सल्लाही पवारांनी दिला.
तीन दिवसीय बारामती दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांनी आज बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावात जाऊन ग्रामस्थांनी संवाद साधला. यापूर्वीच्या दौऱ्यात लोकसभा निवडणूक, आगामी विधानसभा निवडणूक आणि देशातील मोदी सरकारवर भाष्य केलं. त्यानंतर आज बोलताना पवार म्हणाले की, जे काम करायचं होतं ते तुम्ही केलं, मला काही सांगायची वेळ आली नाही. मोदींपेक्षा जास्त मताने तुमचा खासदार निवडून आला आहे. मोदी सांगायचे मोदी की गॅरंटी. पण उनकी गॅरंटी यहा चली नही, मोदींनी काय माझा बांध कोरला नाही. पण, मोदींचे धोरण आपल्या हिताचे नव्हते, असे म्हणत शरद पवारांनी मोदींच्याविरोधात घेतलेल्या भूमिकेवर भाष्य केले. शेतकरी अडचणीत कसा येईल याचा विचार मोदी सरकार करते. मोदी सरकारमधील लोक म्हणतात आम्ही खाणाऱ्या लोकांचा विचार करतो परंतु पिकवणाऱ्याने पिकवले नाही तर खाणारा काय खाईल असा सवाल शरद पवारांनी केला आहे. सत्ताधाऱ्यांनी काळ्या आईशी इमान राखणाऱ्या लोकांचा विचार केला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.
जनाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना केल्या आहेत, योजना केल्या पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी आज त्याकडे ढुंकूनही बघितले नाही. आता हे बदलायचं आहे, आता राज्य हातात घ्यायचं. नीरा नदीचे पाणी स्वच्छ करण्याची गरज आहे, दुधाचे अनुदान मिळण्यासाठी हालचाल करायची तयारी आहे का? हालचाल करण्याची माझी तयारी आहे, असे म्हणत गावकऱ्यांना पवारांनी बोलते केले.
काहीही करा जमीन विकू नका
दमदाटी केली तरी कोणतं बटण दाबायचे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, ते तुम्ही दाबलं. या निवडणुकीत एकही पुढारी नव्हता, कुठं गेले होते काय माहित? मी विचारायचो हे होते का, ते होते का, ते कुणीही नव्हतं. कळलं नाही नेत्याला काय झालं? जेव्हा मतमोजणी झाली तेव्हा कळलं?. आता हा चमत्कार विधानसभेला करायचा आहे. एक चमत्कार तुम्ही करायचा एक चमत्कार मी. पहिले पाणी आणायचं, मग कोणतं कांडे रोवयाचे आणि कोणता डोस कधी द्यायचा हे मी सांगतो, असे म्हणत आगामी विधानसभा निवडणुकांचे रणशिंगही पवारांनी फुंकले. तसेच, काहीही करा पण जमीन विकू नका, जमीन विकू नका मार्ग आपण काढू असा मोलाचा सल्लाही शरद पवारांनी गावकऱ्यांना दिला.
राष्ट्रवादीच्या सर्वच खासदारांची बैठक
आपल्या तीन दिवसीय बारामती दौऱ्यानंतर शरद पवार उद्या पुण्यात जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची उद्या पुण्यात बैठक होणार आहे. या बैठकीला सर्वच नवनिर्वाचित 8 खासदार उपस्थित राहणार असून शरद पवार यांची भेट घेत चर्चा करणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात ही बैठक पार पडणार आहे. त्यामध्ये, नव्याने निवडून आलेल्या 8 खासदारांना शरद पवार करणार मार्गदर्शन करतील. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जाते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)