Disha Salian Case: राणे पिता-पुत्राला न्यायालयाचा दिलासा, जिथे अन्याय होईल तिथे आवाज उठवू: नितेश राणे
Disha Salian Case: दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे.
Disha Salian Case: दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे. दिंडोशीतील सत्र न्यायालयाने राणे पिता-पुत्राला अटी, शर्तींसह अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यानंतर आमदार नितेश राणे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ''केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मला दिशा सालियन प्रकरणी अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. अटी, शर्तींसह हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.'' जामीन मंजूर केल्याने त्यांनी न्यायालयाचे आभार मानत म्हटले आहे की, कोणावर ही अन्याय होत असले तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकार अबाधित ठेवण्याचे काम आज न्यायालयाने केले आहे.
माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले आहेत की, महाविकस आघाडी सरकारने आमच्याविरोधात षडयंत्र रचलं. सरकारने दिशा सालियन यांच्या आई-वडिलांवरती दबाव आणण्याचा प्रयत्न केला. महापौर किशोरी पेडणेकर हे दिशा सालियन हिच्या घरची गेल्या आणि त्यानंतर झालेल्या हालचालीनंतर आमच्यावर गुन्हा दाखल झाला. मात्र आज न्यायालयाने आम्हाला जामीन मंजूर केला आहे, असं ते म्हणाले आहेत. यापुढेही जिथेही अन्याय होत असेल, त्याविरोधात आवाज उठवण्याचे काम आम्ही करणार, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.
काय आहे प्रकरण?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत घेत दिशा सालियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं वक्तव्य केलं होत. दिशा सालियनची बलात्कार करुन हत्या करण्यात आली असल्याचा आरोप देखील नारायण राणे यांनी केला होता. तसेच दिशाने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला होता. यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.