Ashish Shelar : बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकताना बॉम्बे नको मुंबई हे तुम्ही बोललात का? आशिष शेलारांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले, तुमची लेकरं तीन भाषा शिकणार अन्...
Ashish Shelar : तुमची लेकरं ज्या शाळेत शिकली तिथे तिसरी भाषा मराठी आहे, याचे उत्तर द्याल का? मग बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकताना बॉम्बे नको मुंबई हे तुम्ही बोललात का? असंही पुढे शेलार म्हणालेत.

मुंबई : महाराष्ट्रात महायुती सरकारकडून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न झाल्यानंतर राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी संयुक्तपणे मोर्चा काढण्याचा इशारा दिला. परिणामी, अवघ्या काही दिवसांत सरकारला हिंदी सक्तीविषयक जीआर मागे घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर काल(दि. 5 जुलै) वरळी डोममध्ये ‘विजय मेळावा’ पार पडला. त्यावेळी ठाकरे बंधूंनी अनेक मुद्द्यांवरती भाष्य केलं, त्यानंतर आज भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राज आणि उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
त्रिभाषेला विरोध का? आशिष शेलारांचा सवाल
त्रिभाषी सुत्रीला तुमचा विरोध का? आणि मुद्दा काय तुमची मुलं तुमची लेकरं त्या शाळेत शिकतील जिथे तीन भाषा शिकवल्या जातील म्हणजे तुमच्या लेकरांनी तीन भाषा शिकाव्यात, महाराष्ट्रातील अन्य विद्यार्थ्यांनी शिकू नये, हा तुमचा दुराग्रह आणि तुमची लेकरं ज्या शाळेत शिकली तिथे तिसरी भाषा मराठी आहे, याचे उत्तर द्याल का? मग बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकताना बॉम्बे नको मुंबई हे तुम्ही बोललात का? तर आपल्या लेकराने चांगलं ते घ्यायचं, महाराष्ट्रातल्या बाकी लेकरांना जाऊ दे तडफडूदे कमी शिकू दे, हीच भूमिका प्रामाणिकपणाची आहे, असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंना टोला लगावला आहे.
दोन्ही भाऊ एकत्र आले त्याचा आनंद मात्र...
दोन्ही भाऊ एकत्र आले तर आनंद वाटला हे कौटुंबिक प्रश्नाचे उत्तर झालं. दोन पक्ष एकत्र येतील की नाही आले का? तर तो दोन्ही पक्षांचा प्रश्न आहे. त्या दोन्ही पक्ष आपल्या भूमिका घ्यायला ते खुले आहेत, तो सर्वस्वी त्या दोन पक्षांचा निर्णय आहे. त्यावर आम्ही काही प्रतिक्रिया दिली पाहिजे अशी वेळ नाही. पण कालचा कार्यक्रम आणि मराठी भाषा यावर प्रतिक्रिया द्यायचे असेल तर कालचा कार्यक्रम आणि त्यातील झालेली भाषण आणि मांडलेला त्या ठिकाणचा संपूर्ण इव्हेंट याला बघून एवढेच म्हणेन एकाचं भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याच भाषण अप्रसंगीक होतं, एकाने अर्धवट मुद्दे मांडले तेही विपर्यासाचे होते, या प्रत्येक मुद्द्याला मी खोडू शकतो. माहिती संपूर्ण नाही. त्रिभाषा सूत्र कधी आली. यांच्या गावातही ती माहिती नाही. कोणी आणली याची माहिती दिली, ती भाषणात चुकीची होती. साधं गुगल केलं असतं तरी त्यांना त्याचं उत्तर सापडलं असतं. असं धादांत खोटं बोललेत म्हणून एकाचं भाषण अपूर्ण मी त्यांच्या भाषणातली प्रत्येक गोष्ट मांडू शकतो, उद्धवजींच्या भाषणात तर सत्ता गेल्याचा ससेहोलपटपणा होता, तडफड होती असे पुढे असे शेलार यांनी म्हटलं आहे.























