Devendra Fadnavis on Babanrao Lonikar: बबनराव लोणीकरांना समज देण्यात येईल! देवेंद्र फडणवीसांनी लोणीकरांना 'त्या' मुजोर वक्तव्यावरून फटकारलं, म्हणाले...
Devendra Fadnavis on Babanrao Lonikar: नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले होते.

Devendra Fadnavis on Babanrao Lonikar: भाजपा आमदार बबनराव लोणीकर (Babanrao Lonikar) यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचे दिसून आले आहे. एका भाषणादरम्यान, सोशल मीडियावर सरकार आणि स्वतःच्या विरोधात टीका करणाऱ्या तरुणांविषयी त्यांनी आक्रमक शब्दांत संताप व्यक्त केला. "कुचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना अंधभक्त म्हणतात," असे म्हणत त्यांनी टीकाकारांवर सडकून टीका केली. या तरुणांविषयी बोलताना, "हीच कार्टी कूचवट्यावर बसून चर्चा करत असते, आणि त्यांच्यापैकी काहींच्या आईचा पगार व बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच दिलं आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच, "नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये दिले," असेही वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केले. आता बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत.
बबनराव लोणीकरांचं विधान पूर्णपणे चुकीचं : मुखमंत्री फडणवीस
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरी काही लोकांना उद्देशून असं वक्तव्य केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कुणालाही अधिकार नाही. देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की, मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व जण जनतेचे सेवक आहोत. तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचे जे वक्तव्य आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं असून अशा प्रकारचं वक्तव्य योग्य नाही. याची समज बबनराव लोणीकर यांना देण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले होते बबनराव लोणीकर?
आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटलं होतं की, "ते कुचकळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे, त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट अथवा चप्पल आमच्यामुळेच आहेत. तुझ्या हातातलं डबडं, तो देखील आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? आमचं घेऊन आमच्याबद्दल लिहितोस का?", असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते.
आणखी वाचा























