Ramdas Athawale: देवेंद्र फडणवीस मला शिर्डीतून उमेदवारी द्यायला तयार होते, पण एकनाथ शिंदेंना अडचण; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट
Maharashtra Politics: महायुती मनसेलाही एक जागा द्यायला तयार झाली आहे, त्यामुळे रामदास आठवले नाराज आहेत. रामदास आठवलेंनी लोकसभेसाठी शिर्डी आणि सोलापूरच्या जागेची मागणी केली होती. परंतु, महायुतीने रामदास आठवले यांची मागणी फार गांभीर्याने घेतली नाही.
डोंबिवली: रिपब्लिकन पक्षाला महायुतीने लोकसभेच्या किमान दोन जागा द्याव्यात, अशी मागणी सातत्याने लावून धरणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. मला यंदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तयार होते. किंबहुना ते माझ्या उमेदवारीसाठी आग्रही होते. फडणवीसांनी त्यादृष्टीने प्रयत्नही केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना अडचण असल्याने मला शिर्डीची उमेदवारी मिळू शकली नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून रामदास आठवले (Ramdas Athawale) सातत्याने शिर्डी आणि सोलापूर लोकसभेची जागा आमच्या पक्षाला द्यावी, अशी मागणी करत आहेत. परंतु, महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच जागावाटपासाठी रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे रामदास आठवले यांना शिर्डीतून लोकसभेवर जाण्याचा मनसुबा सफल झाला नाही. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीतील एका कार्यक्रमात बोलताना रामदास आठवले यांनी शिर्डीच्या जागेविषयी गौप्यस्फोट केला.
मला शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा होती. 2009 साली लोकसभेच्या निवडणुकीत शिर्डीतून माझा पराभव झाला होता. यंदा आरपीआय पक्षाला लोकसभेची किमान एक जागा मिळावी, असा आमचा आग्रह होता. मात्र, तसे होऊ शकले नाही. परंतु, देवेंद्र फडणवीस यांनी मला आश्वासन दिले आहे की, 2026 मध्ये माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर रिपाईबाबत विचार केला जाईल. केंद्रात रिपाईला कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठीही देवेंद्र फडणवीस प्रयत्न करणार आहेत. तसेच राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा रिपाईला मंत्रिपद देण्यात येईल. याशिवाय, महामंडळाची दोन चेअरमन पदे, जिल्हा कमिटीमध्ये रिपाईला प्राधान्य दिले जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सांगण्यात आल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
देशाचे संविधान कोणीही बदलू शकणार नाही: रामदास आठवले
गेल्या दहा वर्षांच्या कालखंडात नरेंद्र मोदी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांची कामं पूर्ण केली आहेत. मुंबईतील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी 1200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास आम्हाला आहे. या देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही. ते बदलणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत. मात्र, मी त्याठिकाणी मंत्रिमंडळात आहे. मी संविधानाला अजिबात हात लावून देणार नाही, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
आणखी वाचा
मनसेचा विचार केला, मात्र आरपीआयचा नाही, रामदास आठवलेंनी खंत बोलून दाखवली