पुणे : लोकसभेनंतर आता महायुतीतील नेत्यांना विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपाही डोकेदु:खीचं ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, एका-एका जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आणि भाजपचे स्थानिक नेते आपल्या मतदारसंघातील जागेसाठी आग्रही असल्याचे दिसून येते. महायुतीत सध्याच्या जागावाटपानुसार विद्यमान आमदार असलेली जागा त्या त्या पक्षाला मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सबंधित जागेवर इच्छुक असलेल्या इतर उमेदवारांना महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांचा पर्याय शोधावा लागत आहे. इंदापूरमधील विधानसभेची महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल. कारण, सध्या तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, ही जागा आपणास लढवायची असल्याचे सांगत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे, भाजपची अडचण वाढली आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दौंड येथील जागेवरही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे, महायुतीतील डोकेदु:खी वाढत असल्याचे दिसून येते.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांचे निकटवर्तीय आणि दौंड शुगर्सचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी पक्षाचे प्रमुख अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून दौंडमधील (Daund Vidhansabha) जागा महायुतीत राष्ट्रवादीला सोडावी, अशी मागणी केली आहे. मात्र, सध्या या जागेवर भाजप नेते राहुल कुल हे विद्यमान आमदार आहे. त्यामुळे, महायुतीतील विद्यमान आमदाराच्या जागेनुसार ही जागा भाजपच्या वाटेला जाते. त्यामुळे, महायुतीत (Mahayuti) पुन्हा एकदा क्लिष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, वीरधवल यांनी पुढीलप्रमाणे पत्र लिहिले आहे.
वीरधवल पत्रात काय म्हटले
महोदय, उपरोक्त विषयानुसार आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नोव्हेबर 2024 पर्यंत होत बसल्याचे समजते. सध्या आपण महायुतीत सरकारमध्ये सहभागी आहोत. दौंड तालुक्याच्या दृष्टिकोनातून दौंड विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला अतिशय फायद्याची ठरणार आहे. दौंड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मोठी फळी आहे, सद्यस्थितील पक्षाचे सर्व पदाधिकारी पक्षाच्या माध्यमातून विविध संस्थांवर काम करत असणारे कार्यकर्ते हे एकसंध राहून चांगले कार्य करीत आहेत. मावळत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, दौंड नगरपालिका यामध्ये आपल्या पक्षाचे निर्विवाद वर्चस्व होते. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला 50% यश जरी मिळाले असले तरी नुकत्याच झालेल्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत 100% टक्के यश प्राप्त झाले आहे. दौड शहर व तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर किंबहुना पक्षाच्या विचारधारेवर प्रेम करणारे अनेक कार्यकर्ते, मतदार असल्याने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे असावी अशी आमची आपणांस विनंती आहे.
2019 साली आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा अतिशय अल्प मतांनी पराभव झाला, ही गोष्ट याची साक्ष देते. आपण राज्यभर करत असलेले काम त्याचप्रमाणे आपण जाहीर केलेल्या शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम आमच्यासारखे कार्यकतें दौंड तालुक्यात करीत आहे. या सर्व गोष्टींचा फायदा निश्चितच येणाऱ्या विधानसभेत आपल्या पक्षाला होईल, अशी खात्री आम्हाला वाटते. आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून जागा वाटपासंदर्भात महायुतीमध्ये समावेश असलेल्या पक्षांशी आपली पर्चा सुरू असल्याचे समजते. दौंड विधानसभेची जागा आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे घ्यावी ही विनंती, आम्ही सर्वजण कार्यकतें करत आहोत. तसेच, आपण जो उमेदवार द्याल, त्या उमेदवारास भरगोस मतांनी निवडून आणण्याची ग्वाही आपणांस देत आहोत, असेही वीरधवळ जगदाळे यांनी पत्रात म्हटलं आहे.
हेही वाचा
शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती, केवळ...; फडणवीसांनी सांगितला इतिहास, पवार-ठाकरेंना सवाल