संभाजीनगर : सिंधुर्दुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या दुर्दैवी घटनेनंतर राज्य सरकारमधील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही पालघर दौऱ्यात महाराजांच्या पुतळा दुर्घटनेबाबत जाहीरपणे शिवभक्तांची माफी मागितली. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज या दुर्दैवी घटनेबाबत राज्य सरकारविरुद्ध रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनात स्वत: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना उबाठा पक्षाचे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नाना पटोले सहभागी झाले आहेत. तर, शाहू छत्रपतींनीही शरद पवार यांच्यासमवेत या आंदोलनात सहभागी होत राज्य सरकारचा निषेध नोंदवला. महाविकास आघाडीच्या या आंदोलनास प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही आंदोलन केलं आहे. तर, या आंदोलनाबाबत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार व उद्धव ठाकरेंना काही प्रश्न विचारले आहेत. 


देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता माध्यमांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीच्या आंदोलनावर भाष्य केलं. राजकीय हेतूने त्याचं आंदोलना प्रेरीत असल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून केली जात आहे. ''माझा उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) सवाल आहे की, नेहरूंनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Shivaji maharaj) डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे, त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का?. काँग्रेसने मध्यप्रदेश मध्ये ज्या प्रकारे शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून तोडला, त्यावरती शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब मुग गिळून का बसले आहेत?. कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी शिवरायांचा पुतळा का हटवला, याबद्दल ते का बोलत नाहीत?'', या प्रश्नांची उत्तरं पहिल्यांदा त्यांनी दिली पाहिजे. 


आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की, शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. पण, महाराजांनी सूरत लुटली नव्हती, महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना योग्य त्या लोकांकडून घेतला होता, किंवा त्यांच्यावर आक्रमण केलं होतं. पण, सूरत कधी लुटली नव्हती, जणू काही सर्वसामान्य लोकांची लूट करायला महाराज गेले अशा प्रकारचा इतिहास काँग्रेसने आम्हाला इतकी वर्ष शिकवला, त्याला माफी मागायला सांगणार आहात का?, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी विचारला आहे. तसेच, केवळ खुर्ची करता त्यांचे मिंधेपण स्वीकारणार आहात का? हे तुम्ही सांगितलं पाहिजे, असा टोलाही फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना जोडेमारो आंदोलनावरुन लगावला. 


मविआच्या आंदोलनाला भाजपचे आंदोलनाने प्रत्युत्तर


राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीनं आज मुंबईत जोडे मारो आंदोलन केलं. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या विरोधात निदर्शनं केलीत. यावेळी मविआच्या नेत्यांच्या विरोधात फलक हातात पकडून घोषणाबाजी करण्यात आली. तर, अनेक ठिकाणी हे आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच करण्यात आलं आहे.