Nagpur News नागपूर : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महायुती सरकारवर टीका करताना महायुती सरकार शिवद्रोही असून त्यांना राज्यातून गेट आउट करण्याची वेळ आल्याचे भाष्य केले. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) यांनी जोरदार प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, असे बोलणाऱ्यांनाच महाराष्ट्राच्या जनतेने दोन वर्षाआधी गेट आउट करत घरी बसवले आहे. परिणामी महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे.
मुळात या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं (Chhatrapati Shivaji Maharaj) नाव घ्यायचं आणि काम मात्र अफजलखानी आणि औरंगजेबी करायचं, हेच त्यांनी आजवर केलं आहे. शिवाजी महाराजांचं नाव घेऊन निवडणुका लढवायच्या, मात्र निवडून आल्यानंतर कारभार मात्र औरंगजेबी करायचा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर देत जोरदार हल्लाबोल केला आहे. ते नागपूर (Nagpur News) विमानतळावर आले असता बोलत होते.
शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनाच जोडे मारले पाहिजे - एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या दुर्घटनेबद्दल आम्हाला देखील वेदना झाल्या आहेत. घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. याबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तमाम शिवप्रेमींची आणि जनतेची माफी मागितली आहे. असे असताना केवळ राजकीय स्वार्थीपोटी शिवरायांच्या नावाने राजकारण करणं हे अतिशय दुर्दैवी आहे. खऱ्या अर्थाने शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनाच जोडे मारले पाहिजे. महाराष्ट्रातील जनता मात्र सुज्ञ असून आज जोडो मारो आंदोलन करत आहे त्यांना आगामी निवडणुकांमध्ये जनता नक्कीच जोडे मारून आपली जागा दाखवेल, अशी घनाघाती टीकाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना केलीय.
आज राज्यभरात महाविकास आघाडीच्या वतीने मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या कोसळल्या प्रकरणी जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते उद्धव ठाकरे, शरद पवार संजय राऊत नाना पटोले, खासदार शाहू महाराज, सुप्रिया सुळे इत्यादी सह महायुतीतील इतर प्रमुख नेते उपस्थित झाले आहेत. या आंदोलन स्थळावरून मग याच्या नेत्यांनी सरकारवर घनाघाती टीका केली आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर देत जोरदार हल्लाबोल केला आहे.
लाडक्या बहिणी देखील विरोधकांना जोडे मारतील - एकनाथ शिंदे
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती. महाविकास आघाडीतील दिग्गज नेते दंगली विषयी भाष्य करत होते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र हा अशांत पाहिजे आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महाराष्ट्रात दंगली घडवण्याचा, जाती जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याला फार यश आले नाही. सध्या राज्य सरकारने आणलेली महत्वकांशी लाडकी बहीण योजना बंद करण्याचे ही कारस्थान महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र न्यायालयाने देखील माझ्या लाडक्या बहिणींना न्याय दिला असून आगामी काळात लाडक्या बहिणी देखील योजना बंद पाडणाऱ्यांना जोडा मारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला आहे.
हे ही वाचा