मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकांचा प्रचार करण्यासाठी आले होते. यावेळी एका प्रचारसभे दरम्यान नाना यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले. या संबंधिचा एक व्हिडीओ बराच व्हायरल झाला असून भाजपकडून या वक्तव्याचा जाहीर निषेध केला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही नानांच्या या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी त्यांनी नाना यांना शारीरिक उंचीसोबत बौद्धिक आणि वैचारिक उंचीही असावी लागते असा टोला लगावला आहे. तसंच काँग्रेस पक्ष सत्तेसाठी इतक्या रसातळाला गेला आहे का? असा संतप्त सवालही विचारला आहे.
काय म्हणाले फडणवीस?
नाना यांच्या व्हायरल व्हिडीओनंतर संतप्त झालेल्या भाजप नेत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ज्यात फडणवीस यांनी संबधित वक्तव्याचा पंजाबमधील मोदी यांचा ताफा अडवल्याच्या घटनेचा संदर्भ देत टीका केली आहे. ते म्हणाले की, 'पाकिस्तानच्या सीमेनजीक पंजाबमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा ताफा 20 मिनिटे खोळंबून राहतो, तेथील काँग्रेसचे मुख्यमंत्री त्याची साधी दखल सुद्धा घेत नाहीत. आता महाराष्ट्राचे काँग्रेस अध्यक्ष म्हणतात, मी मोदींना मारु शकतो, शिव्या देऊ शकतो. त्यामुळे काँग्रेस पक्षाचं चाललं तरी काय? कधीकाळी स्वातंत्र्याच्या आंदोलनात असणारा हा पक्ष इतक्या रसातळाला? सत्तेसाठी काहीही? काँग्रेसला आता लोकशाहीतील राजकीय पक्ष म्हणायचे, की दहशत पसरविणारे संघटन? नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची पण असावी लागते.' फडणवीस यांनी ट्वीट करत ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
भाजप नेत्यांकडून वक्तव्याचा निषेध
नाना यांच्या या वक्तव्याबाबत केशव उपाध्ये यांनी आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, 'नाना पटोलेंच हे वक्तव्य अत्यंत घाणेरड्या आणि हीन दर्जाचं आहे. यातून काँग्रेस पक्षाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत काय भावना आहे हे दिसून येतं.' तसंच काँग्रेसनं नाना यांच्यावर कारवाई करायला हवी असंही ते म्हणाले.
काय म्हणाले नाना पटोले?
रविवारी संध्याकाळी भंडाऱ्यात घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रात्रीच्या वेळचा आहे. या प्रचाराच्या दरम्यान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भोवती लोकांचा गराडा आहे. त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणतात की, 'मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.' दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले म्हणाले की, "भंडारा जिल्ह्यात मोदी असं टोपणनाव असलेला एक गावगुंड आहे. त्या गुंडाबाबत बोलताना मी ते वक्तव्य केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ते नाही."
हे ही वाचा -
- 'मी मोदींना मारु शकतो' काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं वक्तव्य, व्हिडीओ होतोय व्हायरल
- मुंबईने तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला, टास्क फोर्स तज्ज्ञांचे अनुमान; सलग चौथ्या दिवशी रुग्णसंख्येत घट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha