मुंबई : सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातही दररोज 40 हजारांच्या पुढे रुग्णसंख्येची नोंद होत आहे. अशातच मुंबईमध्ये मात्र, रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. बुधुवारी मुंबईत  16 हजार 420, गुरुवारी 13 हजार 702 , शुक्रवारी 11 हजार 317, शनिवारी 10,661 तर रविवारी मुंबईत 7 हजार 895 नवे कोरोना बाधित आढळले होते.  त्यामुळे त्यात सातत्याने घट दिसून आली. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या लाटेचा सर्वोच्च बिंदू ओलांडला असल्याचे मत राज्य सरकारच्या कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केले आहे. 


मुंबईत सध्या रुग्णसंख्येत घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे कदाचीत तिसरी लाट येऊन गेल्याचे डॉ. शशांक जोशी यावेळी म्हणाले. मागील काही दिवसांच्या तुलनेतील ही रुग्णसंख्या दिलासादायक असल्याने नागरिक आणि पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. मुंबईत मागील 24 तासांत 7 हजार 895 नवे कोरोना बाधित आढळले असून जवळपास याहून तीनपटीने अधिक म्हणजेच 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात देखील केली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाची तिसरी लाट ओसरली असल्याचे टास्क फोर्सने म्हटले आहे. तर ही घोषणा करण्यापूर्वी किमान एक आठवडा आणखी परिस्थिती पाहिली पाहिजे, असे बीएमसीच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी म्हटले आहे.


मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मागील काही दिवसांपासून घट पाहायला मिळत आहे. पण राज्यात आणखी दररोज 40 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होत आहे. काही प्रमाणात राज्यात घट होत आहे.  राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात 41 हजार 327 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी राज्यात 40368 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत 2 ते 8 जानेवारी दरम्यान 1 लाख 2 हजार 409 कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर पुढच्या आठवड्यात म्हणजे 15 जानेवारीपर्यंत मुंबईत एकूण 96 हजार 869 रुग्णांची नोंद झाली होती. म्हणजे रुग्णसंख्या कमी झाली आहे. राज्याचा विचार केला तर 2 ते 8 जानेवारी दरम्यान राज्यात 1 लाख 87 हजार 665 रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्यापुढील आठवड्यात कोरोना रुग्णांचा आकडा हा 2 लाक 91 हजार 984 झाला होता. या आठवड्यापासून मुंबईतील रुग्णसंख्येत आणखी घट हईल असा अंदाज बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त असल्याचेही ते म्हणाले. तर दुसरीकडे डॉक्टरांनी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे.