Nagpur Politics : महाविकास आघाडीकडून जनतेची दिशाभूल; भाजप युवा मोर्चाचा आरोप
Nagpur News Update : महाविकास आघाडीकडून आपलं अपयश लपविण्यासाठी राज्य सरकारवर आरोप करण्यात येत असून याद्वारे राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप करत भाजप युवा मोर्चाने मविआचा निषेध नोंदविला.
Nagpur News Update : महाविकास आघाडीकडून महाराष्ट्रातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले. गेल्या तीन महिन्यात ही प्रक्रिया झालेली नाही. मात्र राज्य सरकारची बदनामी करण्याचा महाविकास आघाडीचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चाच्या (BJP) सरचिटणीस शिवाणी दाणी यांनी केला. राज्यातील विरोधी पक्षाकडून गुंतवणूक राज्याच्या बाहेर जात असल्याचा भ्रम प्रसरवला जात असल्याचा निषेध म्हणून नागपूरमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून विरोधी पक्षातील नेत्यांच्या पुतळ्यांचे दहन करत निदर्शने करण्यात आली.
नागपूरच्या आयटी पार्कमध्ये भाजप युवा मोर्चातर्फे ही निदर्शने करण्यात आली. शहर अध्यक्ष पारेंद्र पटले यांच्यासह शहरातील शेकडो युवा मोर्चाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. राज्यातील गुंतवणूक महाविकास आघाडी सरकारच्या काळात बाहेर गेली. मात्र विरोधी पक्षाचे नेते हे गुंतवणूक बाहेर गेल्याचा आरोप राज्य सरकारवर करत आहेत आणि जनतेमध्ये भ्रम पसरवत आहेत. याचा निषेध म्हणून आम्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या पुतळ्यांचे दहन केले असे भारतीय जनता युवा मोर्चा (Yuva Morcha) कडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील प्रकल्प दुसऱ्या राज्यात पळविण्यात येत असल्याचा आरोप सतत विरोधकांकडून करण्यात येत असून गुजरात येथे निवडणुका असल्याने महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातमध्ये जात असल्याचेही आरोप राज्य सरकारवर करण्यात येत आहे. दरम्यान, यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांना उत्तर दिले. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील लगेच पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं.
'मविआच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न'
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाच टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेला. त्यावेळी महाराष्ट्राचं वातावरण गुंतवणुकीसाठी चांगलं नसल्याचं गुंतवणूकदार म्हणायचे असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. महाविकास आघाडी सरकारच्या अपयशाचं खापर आमच्यावर फोडलं जात असल्याचा आरोप देखील फडणवीस यांनी केला. तसेच नाणार रिफायनरी प्रकल्प हा आम्ही महाराष्ट्रात पूर्ण करणारच असाही विश्वास त्यांनी सोमवारी घेतलेल्या परिषदेत दिला. फॉक्सकॉन आमच्या काळात महाराष्ट्राबाहेर गेला नाही. उद्धव ठाकरेंच्या काळात त्या वेळचे उद्योगमंत्री सुभाष देसांईनी सांगितलं होतं की फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. टाटा एअरबसच्या बाबतीत हीच गोष्ट लागू असल्याचेही यावेळी फडणवीस यांनी सांगितले.
"याबाबत मुख्यमंत्र्यांनी बोलणे अपेक्षित"
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर दिलं. "जे उत्तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित होतं ते उपमुख्यांनी दिलं आहे. त्यामुळे खरे अधिकार कोणाकडे आहेत ते जनतेच्या लक्षात आलं आहे. आपल्या राज्यातून अनेक प्रकल्प बाहेर राज्यात जात आहेत. हे प्रकल्प बाहेर गेल्यानंतर सांगण्यात आलं की, दुसरे मोठे प्रकल्प आणू. परंतु, महाराष्ट्राला मोठ्या प्रकल्पाचं गाजर दाखवलं जात आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.
महत्त्वाची बातमी