MLA Disqualification : शिंदे गटाने कागदपत्रे मागितली, अध्यक्षांकडून आठवड्याची मुदत; शिवसेनेच्या पात्र-अपात्र आमदारांचा निर्णय लांबणीवर
शिवसेनेचे (Shiv Sena) कोणते आमदार पात्र आणि कोणते अपात्र याबाबत आजच्या प्रत्यक्ष सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक आठवड्याची मुदत दिली आहे.

मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) कोणते आमदार पात्र आणि कोणते अपात्र याचा निर्णय आता एक आठवड्यानंतर होणार आहे. कारण आजच्या प्रत्यक्ष सुनावणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी एक आठवड्याची मुदत दिली आहे. शिंदे गटाने (Shinde Group) कागदपत्रांची मागणी करत दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. मात्र अध्यक्षांनी तूर्तास तरी दोन्ही गटांना आठवड्याचा अवधी दिला आहे.
शिवसेनेच्या पात्र-अपात्र आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीला आज सुरुवात झाली. दोन्ही गटाच्या आमदारांना प्रत्यक्ष विधानभवनात हजर राहण्याच्या सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्या होत्या. या सुनावणीला शिंदे गटाचे 21 तर ठाकरे गटाचे 14 आमदार उपस्थित होते. सर्व याचिका स्वतंत्र आहेत, त्यामुळे या याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी होईल, असं अध्यक्ष नार्वेकर सुनावणीदरम्यान म्हणाले. शिंदे गटाकडून निहार ठाकरे तर ठाकरे गटाकडून देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला.
सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे याचिका
ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू विरुद्ध एकनाथ शिंदे या याचिकेवर युक्तिवाद झाला. शिंदे गटाच्या आमदारांनी व्हिपचं उल्लंघन केल्याची याचिका ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली होती. त्यावर, याचिकेची कागदपत्रे प्राप्त न झाल्याने बाजू माडंण्यात अडचण निर्माण झाली आहेे, असा युक्तिवाद शिंदे गटाने केला. त्यामुळे दोन आठवड्यांचा वेळ द्यावा अशी विनंती देखील शिंदे गटाकडून करण्यात आली. त्यावर अध्यक्षांनी कागदपत्रांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि त्यावर लेखी उत्तर देण्यासाठी दोन्ही गटांना एक आठवड्याचा वेळ दिला आहे.
रवींद्र वायकर काय म्हणाले?
"विधानसभेमध्ये कोर्ट आल होतं. आज वादी प्रतिवादी यांनी बाजू मांडली. 22 याचिकेवर आज चर्चा झाली. काही याचिका एकत्र करण्यात आल्या. शिंदे गटाच्या वकिलांनी 2 आठवड्याच्या वेळ मागून घेतला आहे. वेळ काढण्याचं साधन आहे का असा प्रकार आम्हाला वाटलं. भरत गोगावले यांना कोर्टाने व्हिप ठरवलं नाही. सुनील प्रभू व्हीप आहेत. सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतरदेखील अजूनही वेळ काढूपणा सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने 3 महिन्याचा वेळ दिलाय परंतु तीन महिन्यापेक्षा जास्त वेळ लागेल असं सध्या चित्र आहे," असं रवींद्र वायकर म्हणाले.
भास्कर जाधवांचा हल्लाबोल
"30 जूनला शिवसेनेतील गट फोडून भाजपने सरकार बनवलं. त्यांनतर आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे शेड्यूल 10 प्रमाणे कारवाई करावी अशी मागणी केली परंतु अध्यक्षांनी काहीच निर्णय घेतला नाही. अध्यक्षांनी सातत्याने वेळकाढूपणा केला आहे. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की भरत गोगावले व्हिप नाहीत. परंतु अध्यक्षांनी त्यावर देखील कारवाई केली नाही. आज आमच्या वकिलांनी चांगल्याप्रकारे भूमिका मांडली. याचिकाकर्त्याने आपली कागदपत्रे प्रतिवाद्याला सांगितलं आहे. हे सरकार लवकरच पडेल. परंतु सध्याच्या सरकारमध्ये कायदा गुंडाळून ठेवण्याचं काम सरकार करत आहे. जे आम्हाला सोडून गेले आहेत ते घरी जाणार आहेत. 10 अधिक 7 दिवस अध्यक्षांनी दिले आहेत. आमच्या वतीने पूर्णपणे युक्तिवाद हा देवदत्त कामत यांनीच केला. बाकी कुणी केला नाही, उलट शिंदे गटाच्या वकिलांमध्ये अस्वस्थता होती," असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला.
आम्ही नाही तर ठाकरे गट वेळकाढूपणा करत आहेत : योगेश कदम
"वेळकाढूपणा आम्ही नाही तर ते करत आहेत. जर योग्य सुनावणी करायची होती तर सगळी कागदपत्रे आम्हाला दिली पाहिजे. आता अध्यक्षांनी त्यांना आम्हाला दस्तावेज द्यायला सांगितलं आहे. नंतर त्यावर आम्ही उत्तर देऊ," असं योगेश कदम म्हणाले.
कैलास पाटील
कैलास पाटील म्हणाले की, "खरंतर प्रत्यक्षात सुनावणी झालीच नाही असं म्हणता येईल. शिंदे गटाचा म्हणणं आहे की आम्ही दाखल केलेल्या याचिकेची कागदपत्रे आणि माहिती त्यांना मिळाली नाही. अध्यक्षांना देणे ही त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी होती. आता त्यात वेळकाढूपणा केला जात आहे. आता 10 दिवसाचा वेळ त्यांना देण्यात आला आहे. शिवाय आमच्या वतीने वकिलांनी विषय एकच असल्याने एकत्रित सुनावणी घेऊन पुढील आठवड्यात निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. आता त्यावर सुद्धा म्हणणं मांडायला शिंदे गटाला वेळ दिला जाईल. यात वेळकाढूपणा होतोय आमचं म्हणणं आहे, त्यावर निर्णय घ्यावा."
राजन साळवी
"कितीही वेळकाढूपणा केला तरी केला आम्हाला विश्वास आहे शिंदे गटाचे 16 आमदार घरी जातील," असा दावा राजन साळवी यांनी केला.
सुनील प्रभू
"सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. त्यांनी अपात्रतेबाबत निर्णय घ्या असं सांगितलं होतं तसेच सुनिल प्रभू यांच्या व्हिपला मान्यता दिलेली होती. शिवाय अध्यक्षांनी अपात्रतेबाबत निकल द्या असं देखील सांगितलं होतं. आमच्या वकिलांनी अध्यक्षांना निर्णय घ्या असं सांगितलं. परंतु शिंदे गटाने वेळकाढूपणा करण्यासाठी कागदपत्रे मिळाली नाही असं सांगितलं. वेळकाढूपणाची करणं दाखवायची आणि वेळ वाढवून घ्यायचं असा प्रकार सुरु झाले आहेत. आम्ही आज अध्यक्षांकडे तत्काळ निर्णय घ्यावा असं प्रतिज्ञापत्र देणार होतो, परंतु काहीं सुधारणा करुन लवकरच आम्ही प्रतिज्ञापत्र देऊ. शेड्यूल 10 प्रमाणे निर्णय आधीच येणं अपेक्षित होतं परंतु अद्याप घेण्यात आला नाही," असं सुनील प्रभू म्हणाले.
भरत गोगावले
कुणीही वेळ काढूपणा करत नाही. विजय कुणाचा होईल हे कळेलच त्यांना कल्पना आहे आता फक्त 14 उरले आहेत. आम्ही त्यांना विनंती केली तिकडे करमत नसेल तर इकडे या. मंत्रिमंडळ विस्तार होईल असं वाटतं, असे शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी सांगितले.
हेही वाचा
कोण पात्र , कोण अपात्र? शिवसेनेची सर्वात मोठी सुनावणी, दोन्ही गटाचे आमदार विधानभवनात!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
