मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024 Result) निकालानंतर राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाच्या आमदारांत धाकधूक वाढली आहे, असं म्हटलं जातंय. लोकसभा निवडणुकीत अनेक विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीची मतं कमी झाली आहेत. याच कारणामुळे विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना अनेक आमदार चिंतेत आहेत, असं सांगितलं जातंय. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे (NCP) नेते तथा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी 18 ते 19 आमच्या संपर्कात आहेत, असा दावा केलाय. त्यामुळे आगामी काळात अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार काय़? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. यावरच आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. 15 सेकंदांच्या प्रतिक्रियेत त्यांनी आमदार नाराजीचा विषय संपवला आहे. 


अजित पवार काय म्हणाले?


मी माझ्या सर्व आमदारांशी चर्चा केली. मला सर्व आम्ही तुमच्यासोबतच राहणार आहोत, असं मला सर्व आमदारांनी सांगितलं आहे. हे सर्व आमदार पक्षातच राहणार आहेत. राष्ट्रवादी पक्ष हा आमचा परिवार आहे. हा परिवार आम्ही पुढे घेऊन जाऊ असं मला आमदारांनी सांगितलं, असं अजित पवार म्हणाले. 


जयंत पाटील काय म्हणाले होते? 


लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांच्या कथित नाराजीवर सूचक भाष्य केलं होतं. मी या विषयावर जास्त बोलणार नाही. पण माझ्या मोबाईलचा वापर वाढला आहे, एवढं मात्र मी नक्की सांगतो, असं जयंत पाटील म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर आमदार नाराजीच्या कथित चर्चांना चांगलीच हवा मिळाली. 


अजित पवार यांच्या बैठकीला सहा आमदार अनुपस्थित


लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने चार जागा लढवल्या होत्या. त्यातील रायगड या फक्त एका जागेवर अजित पवार यांना विजय मिळवता आला. या निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांनी 6 जून रोजी आपल्या सर्व आमदारांची एक बैठक बोलावली. या बैठकीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. मात्र या बैठकील एकूण सहा आमदार अनुपस्थित होते. त्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, सिंदखेड राजाचे राजेंद्र शिंगणे, अहेरीचे धर्मराव बाबा अत्राम, वडगाव शेरीचे सुनिल टिंगरे, माढ्याचे बबन शिंदे, पिंपरीचे अण्णा बनसोडे अशी बैठकीला अनुपस्थित असलेल्या आमदारांची नावे आहेत. दरम्यान, आमदार नाराजींच्या चर्चा अजित पवार यांनी फेटाळल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा :


Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले