Ajit Pawar on Muslim Voters : पुणे : यंदाच्या लोकसभा निवडणुकांचा निकालांनी (Lok Sabha Election 2024) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीला (Maha Vikas Aaghadi) मतदारांनी कौल दिल्याचं पाहायला मिळालं. तर महायुतीला (Mahayuti) अवघ्या 17 जागांवर समाधान मानावं लागलं. अशातच आता सर्वच राजकीय पक्ष आपली पुढची रणनिती आणि पराभवाची कारणं ओळखून, चुका सुधारुन आपली भूमिका ठरवत आहेत. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका हॉटेलमध्ये आमदारांची बैठक बोलावलेली. पण या बैठकीला अनेक आमदार गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीला न आलेल्या पाच आमदारांनी काही वैयक्तिक कारणं सांगितली. याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी मीडियासमोर येऊन मौन सोडलं आहे.
आमदारांच्या भेटीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, निकालानंतर मी कोणाशीही बोललो नाही. आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही. महाराष्ट्राच्या निकालावर आम्ही खूश नाही. मला असं वाटतं की, निकालाची जबाबदारी माझी आहे. मला जनतेचा निकाल स्वीकारावा लागेल. मी निकालांची संपूर्ण जबाबदारी घेतो. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. एकही आमदार नाराज नाही. बारामतीच्या निकालाचं मला खूप आश्चर्य वाटतंय आणि मला हेच कळत नाहीये बारामतीत असं कसं झालं?
भविष्यात कठोर निर्णय घ्यावे लागतील : अजित पवार
अजित पवार बोलताना म्हणाले की, "बारामतीच्या जनतेनं मला साथ का दिली नाही, याचं मला खूप आश्चर्य वाटतंय. इतर मतदारसंघ सोडा पण मला बारामतीत ही अपेक्षा नव्हती. मुस्लीम समाज आमच्यापासून दूर गेलाय, राज्यघटना बदलण्याची चर्चा झाली आणि आम्ही त्याचा प्रतिकार करू शकलो नाही. आरक्षणाच्या बाबतीतही महायुतीला छत्रपती संभाजीनगर वगळता मराठवाड्यात एकही जागा मिळाली नाही. भविष्यात कठोर निर्णय घ्यावे लागतील."
अजित पवार म्हणाले की, "मी अमोल मिटकरींना म्हणालेलो, ब्रीफिंग वेगळं होतं. बारामतीत काहीही झालं नाही. कुणालाही दोष देऊ नये. मी परफॉर्म करू शकलो नाही. मी जबाबदारी घेतो. सुप्रिया सुळे निवडून आल्या, पण मला वाटतं की, मी स्वत: कामगिरी करू शकलो नाही, मी कमी पडलो. संविधान बदलता येणार नाही, हे मतदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तसं झालं नाही." तसेच,
अजित पवारांच्या बैठकीला आमदार वैयक्तिक कारणं सांगून गैरहजर
अजित पवारांनी गुरुवारी बैठक बोलावली होती. पण त्या बैठकीला पाच आमदार गैरहजर होते. पाचही आमदारांनी हजर न राहण्यामागे वैयक्तिक कारणं दिल्याचं राष्ट्रवादीच्या सूत्रांचं म्हणणं आहे. पाचपैकी एकही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात नाही. आमदारांच्या बैठकीला उपस्थित न राहण्यामागे या सर्वांची वैध वैयक्तिक कारणं होती आणि वरिष्ठ नेत्यांना त्याची आधीच माहिती देण्यात आली होती, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे. आमदार धरमरावबाबा आत्राम हे आजारी आहेत, नरहरी झिरवाळ रशियात आहेत, सुनील टिंगरे बाहेरगावी गेले आहेत, राजेंद्र शिंगणे आजारी आहेत आणि अण्णा बनसोडे वैयक्तिक कारणानं बैठकीला गैरहजर असल्याची माहिती मिळत आहे.
पाहा व्हिडीओ : Ajit Pawar NCP Lok Sabha Result : अजित पवारांच्या बंडखोरीला मतदारांकडून चोख उत्तर