Congress President : काँग्रेसचा अध्यक्ष तर बदलला, हायकमांड बदलणार का? आता गांधी कुटुंबाचा रोल नेमका काय असणार?
Congress President : काँग्रेसचा नवा अध्यक्ष तर निवडला गेलाय, पण काँग्रेसचं हायकमांड बदलणार का हा प्रश्न आहे. मल्लिकार्जुन खरगे पक्षाध्यक्षपदी निवडून आल्यानंतर गांधी कुटुंबातल्या व्यक्तींचे पक्षातले रोल काय असणार हे पाहावं लागेल.
Congress President : मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) काँग्रेसचे अध्यक्ष (Congress President) तर बनले, पण या सगळ्यात आता गांधी कुटुंब नेमकं कुठे असणार..खर्गेंच्या नेतृत्वात राहुल, प्रियंका यांचा रोल काय असणार..सोनिया गांधी (Sonia Gandhi) कुठल्या अधिकारांवर कायम असणार याची उत्सुकता आहे. साहजिकच अध्यक्ष बदलला तरी हायकमांड लगेच बदलण्याची शक्यता कमी आहे. कारण मुळात काँग्रेस अध्यक्षपदासाठी खर्गेंची निवडच गांधींच्या मर्जीतले उमेदवार म्हणून बघितली जात होती.
राहुल गांधी यांना काल त्यांच्या नव्या रोलबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की, "मल्लिकार्जुन खर्गे माझे बॉस..ते सांगतील ते करणार." अर्थात ही केवळ लोकांच्या समजुतीसाठीची व्यवस्था. गांधी कुटुंबाच्या शब्दाबाहेर जाऊन खर्गे किती काम करतील हा प्रश्नच आहे.
खर्गेंच्या नेतृत्वात गांधी कुठे असणार?
- सोनिया गांधी संसदीय पक्षाच्या नेत्या म्हणून कायम असतील
- लवकरच खरगेंच्या जागी राज्यसभेत नवा विरोधी पक्षनेता निवडला जाईल
- त्यात सोनिया गांधींचाच शब्द संसदीय पक्षाच्या नेत्या म्हणून अंतिम असेल
- अध्यक्षपदासाठी निवडणूक झाल्यानंतर वर्किंग कमिटीसाठी पण निवडणुका व्हाव्यात हा जी 23 गटाचा आग्रह आहे
- खरगे त्यात नेमकी काय भूमिका काय घेतात हे पाहणं महत्वाचं असेल
- प्रियंका गांधी यूपीच्या महासचिव आहेत, यूपीतल्या दारुण पराभवानंतरही त्यांच्यावरची ती जबाबदारी कायम आहे
- राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत सहभागी आहेत, कुठल्याही दुसऱ्या पदावर नसले तरी गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीसाठी प्रचारात तेच प्रमुख चेहरा असण्याची शक्यता
मल्लिकार्जुन खर्गेंची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सोनिया, प्रियंका गांधी वाड्रा त्यांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या. नवे अध्यक्ष म्हणून खर्गे गांधी कुटुंबाच्या प्रभावातून पक्षाला बाहेर काढू शकतील का शंकाच आहे. कारण अध्यक्ष कुणी असला तरी नेतृत्व गांधी कुटुंबाचंच असेल असे स्वत: खर्गेही सांगत आले आहेत.
अशोक गहलोत हे गांधी घराण्याचे अध्यक्षपदासाठी पहिली पसंती होते. पण ते रेसमधून बाहेर झाल्यानंतर पसंती मिळाली ती खर्गेंना. याचं कारण त्यांची पक्षनिष्ठा. सलग नऊ वेळा विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रम खर्गेंच्या नावावर असूनही कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाने मात्र त्यांना कायम हुलकावणी दिली. कधी कधी तर त्यांच्यापेक्षा ज्युनियर व्यक्तींच्या हाताखाली त्यांना काम करावं लागलं. पण खर्गेंच्या तोंडातून कधी नाराजीचा सूर उमटलेला नव्हता.
पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर गांधी कुटुंबासोबतचा त्यांचा हा समतोल कसा राहतो. घराणेशाहीच्या आरोपांपासून पक्षाला दूर ठेवण्यासाठी खर्गे काही मेहनत करतात का हेही पाहणं औत्सुक्याचं असेल. त्याची पहिली झलक अर्थातच वर्किंग कमिटीच्या रचनेत दिसेल. पक्षाच्या सर्वोच्च समितीत गांधी कुटुंबाला कसं स्थान मिळतं यावरच खर्गेंच्या कार्यशैलीची झलक दिसेल.