Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी शशी थरुर (Shashi Tharoor)  विरुद्ध अशोक गहलोत (Ashok Gehlot) असा सामना होण्याची शक्यता आहे. लोकसभा खासदार शशी थरुर यांनी काल (19 सप्टेंबर) दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली, त्यानंतर या चर्चांना अधिकच पुष्टी मिळाली. थरुर यांना निवडणूक लढवण्यास सोनियांनी ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती आहे. 


काँग्रेस अध्यक्षपदासाठी 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. नामांकन दाखल करण्याचा दिवस जवळ आला तरी अजूनही गांधी घराण्यातून कुणी उमेदवार असणार का याची स्पष्टता नाही. सोनिया, राहुल, प्रियंका हे तिघेही यावेळी गांधी घराण्यातून कुणी उभे राहणार नाही यावर ठाम आहेत. पण ते स्वत: रिंगणात नसतील तरी त्यांच्या पसंतीचा उमेदवार कोण याची उत्सुकता आहेच.


राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवावी अशी गांधी कुटुंबाची इच्छा आहे. पण गहलोत यांचा जीव राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदात अडकला आहे, कुठल्याही परिस्थितीत हे पद सचिन पायलट यांना सोडायला ते तयार नाहीत. शिवाय स्वत: निवडणूक लढण्यापेक्षा राहुल गांधींनाच विनवणी करण्याची रणनीती त्यांनी आखल आहे. 


गांधी कुटुंबाबाहेरचा अध्यक्ष काँग्रेसला मिळणार का?
- 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधीनी अध्यक्षपद सोडलं, त्यानंतर तीन वर्षांपासून हा पेच कायम आहे
- गांधी कुटुंबातलं उभं राहणार नसेल तर मग अशोक गहलोत यांचाच पर्यात उरतो. तेही तयार नसतील तर मुकूल वासनिक यांच्यासारखा कुणी उमेदवार शोधला जाईल का याचीही उत्सुकता आहे
- आतापर्यंत महाराष्ट्रासह नऊ राज्यांनी राहुल गांधींनी अध्यक्षपद स्वीकारावं असा ठराव मंजूर केला आहे, पण ते स्वत: निवडणूक लढवायची नाही यावर तूर्तास तरी ठाम आहेत. 


गांधी कुटुंबातील निवडणुकीत उतरल्यास काय? G-23 गटात मतभेद
G-23 गटातल्या ज्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये अंतर्गत बदलांची मागणी केली होती, त्यात शशी थरुर यांचंही नाव होतं. काही दिवसांपासून अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या मतदार याद्या मिळत नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. पण नंतर पक्षाने दिलेल्या उत्तराने आपलं समाधान झाल्याचंही ते म्हणाले. गांधी कुटुंबातलं कुणी रिंगणात उतरल्यास काय करायचं याबद्दलही G-23 गटात मतभेद आहेत. 
 
एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेत व्यस्त आहेत, तर त्याचवेळी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं बिगुल वाजत आहे. ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत, त्याच्या एक दिवस आधी भारत यात्रेचा एक दिवसाचा ब्रेक आहे. त्या दिवशी राहुल गांधी केरळमधून दिल्लीत विमानाने येतील आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी यात्रेत परततील. या एका दिवसात अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत त्यांचा अंतिम निर्णय ठरण्याची शक्यता आहे. तोपर्यंत तरी थरुर विरुद्ध गहलोत याच सामन्याची चर्चा सुरु राहिल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या


Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या बिनविरोध निवडीला पृथ्वीराज चव्हाण यांचा विरोध?