Congress President Election : काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची बिनविरोध निवड करण्याला राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी विरोध केला असल्याचं समजतं. खरंतर राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड व्हावी, असा ठराव महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या बैठकीत संमत झाला होता. हा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ठेवला होता, ज्याला बैठकीत उपस्थित सगळ्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला होता. परंतु मिळालेल्या माहितीनुसार यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी हात वर केला नव्हता. 


महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या बैठकीत ठराव मंजूर
राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगड पाठोपाठ महाराष्ट्र काँग्रेस कमिटीनेही खासदार राहुल गांधी यांना पक्ष अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर केला आहे. सोमवारी (19 सप्टेंबर) पक्षातील नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृह इथे पार पडली. या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला होता. जो एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या बैठकीला प्रदेश निवडणूक अधिकारी, माजी केंद्रीय मंत्री पल्लम राजू, प्रदेश प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.  


शशी थरुर काँग्रेस पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार?
एकीकडे गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानसह आणि दिल्लीसह अनेक राज्यांतील काँग्रेस समित्यांनी राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी निवड करण्याचा ठराव मंजूर केला असताना दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरुर हे देखील पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरणार आहेत. त्यासाठी त्यांना काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींकडूनही परवानगी मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शशी थरुर यांनी सोमवारी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शशी थरुर यांना पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्यास सोनिया गांधींकडून मंजुरी मिळाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या आहेत की, "जर त्यांची (शशी थरुर) इच्छा असेल तर ते पक्षाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवू शकतात. कोणीही निवडणूक लढवू शकतो."


G-23 गटात पृथ्वीराज चव्हाण, शशी थरुर यांचा समावेश 
पृथ्वीराज चव्हाण हे G-23 गटातील नेत्यांपैकी एक आहेत. काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी या गटाची प्रमुख मागणी आहे. G-23 गटात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. ऑगस्ट 2020 मध्ये पहिल्यांदा या नेत्यांचा गट चर्चेत आला होता. या गटात तेव्हा 23 नेत्यांचा समावेश होता. त्यामुळे त्यांना G-23 म्हटलं गेलं. या गटात सामील असेलल्या जितीन प्रसाद हे भाजपमध्ये सहभागी झाले. कपिल सिब्बल यांनी पक्षाला रामराम केला. सिब्बल आता सपाच्या समर्थनाने राज्यसभा खासदार आहेत. तर गुलाम नबी आझाद यांनीही पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तर योगानंद शास्त्री यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा हात पकडला आहे. 


संबंधित बातम्या


Congress President Election: शशी थरूर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतात, सोनिया गांधींनी दिली मंजुरी


राहुल गांधींना पक्षाध्यक्ष करा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर