Hingoli News : "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासोबत नसतील तर कदाचित दिल्ली हायकमांडची भेटही होणार नाही. दिल्ली जेवढं देवेंद्र फडणवीस यांचं ऐकते तेवढं एकनाथ शिंदे यांचं ऐकेल का," अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्र्याच्या दिल्ली दौऱ्यावर केली आहे. ते हिंगोलीत बोलत होते.


मुख्यमंत्री उद्या दिल्ली दौऱ्यावर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या (21 सप्टेंबर) दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांसोबत उद्योगमंत्री उदय सामंत, कृषीमंत्री अब्दुल सत्तारही जाणार आहेत.राज्यातील रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदेंचा हा दौरा असल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची देखील भेट घेणार आहेत. वेदांता-फॉक्सकॉन हा हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण करणारा प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आहे. महाविकास आघाडीमधील घटक पक्षांसह विविध क्षेत्रातून शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.


दिल्ली हायकमांड एकनाथ शिंदेंचं ऐकेल का? : जयंत पाटील
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की,"देवेंद्र फडवणीस हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत नसतील तर एखाद्या वेळी दिल्ली हायकमांडची भेटही मिळणार नाही." उपमुख्यमंत्री गेल्याशिवाय सीएमचं तिथे कोण ऐकणार? मुख्यमंत्री एकटे दिल्लीला जाऊन काय उपयोग असा सवाल विचारत मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्र्यांनीही सुद्धा जायला हवं, असं जयंत पाटील म्हणाले. "उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जेवढं दिल्ली ऐकते तेवढं एकनाथ शिंदे यांचं ऐकेल का, असाही प्रश्न जयंत पाटील यांनी उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर मी समजू शकतो की महाराष्ट्र सरकार गंभीर आहे, असं म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्र्याच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली.


एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आलं. यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे गटाने भाजपच्या साथीने सत्ता स्थापन केली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अनेक वेळा दिल्लीवारी झाली. परंतु शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी कायमच एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली. शिवसेना कधीही दिल्लीसमोर झुकली नाही, परंतु शिंदे-फडणवीस सरकार हे दिल्लीच्या मर्जीवर चालतं अशी टीका सातत्याने केली जात होती. आता जयंत पाटील यांनीही हाच मुद्दा घेत एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्या खोचक टिप्पणी केली आहे.