Congress Loksabha candidate list : काँग्रेसने राज्यातील लोकसभा उमदेवारांची दुसरी यादी (Congress Loksabha candidate list) जाहीर केली आहे. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसने विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. तर भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघातून प्रशांत पडोळे यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. यापूर्वी काँग्रेसने राज्यातील 7 उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज (दि.23) काँग्रसने राज्यातील 4 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. 


विदर्भातील चार उमेदवार काँग्रेसकडून जाहीर 


काँग्रेसने राज्यातील दुसऱ्या यादीत विदर्भातील उमेदवार जाहीर केले आहेत. रामटेकमधून रश्मी बर्वे यांना तर गडचिरोलीतून नामदेव किरसान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले निवडणुकीच्या मैदानात उतरणार अशी चर्चा होती. मात्र, अद्याप दोघांपैकी कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही. 


नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे मैदानात 


केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. अखेर काँग्रेसने विकास ठाकरे यांना गडकरींविरोधात मैदानात उतरवले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले मैदानात उतरले होते. मात्र, नाना पटोले यांचा दारुण पराभव झाला होता. नितीन गडकरी यांनी नाना पटोलेंना 2 लाख 84 हजार मतांनी पराभूत केले होते. 






नाना पटोलेंनी असमर्थता दर्शवल्याने प्रशांत पडोळे रिंगणात 


नाना पटोले यांनी लोकसभा निवडणूक लढवायला असमर्थता दर्शवली. त्यामुळे अखेरीस डॉ. प्रशांत पाडोळे यांना भंडारा-गोंदियातून उमेदवारी देण्यात आली आहे. रामटेकच्या जागेवर शिवसेना आग्रही होती. मात्र ही जागा काँग्रेसला सोडण्यात आली आहे. चंद्रपूरच्या जागेवर विजय वडेट्टीवार तयार नसल्याने या जागेचा निर्णय बाकी आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


काँग्रेसचे राज्यातील आत्तापर्यंत जाहीर झालेले उमेदवार 


कोल्हापूर - शाहू महाराज, सोलापूर - प्रणिती शिंदे, पुणे -रवींद्र धंगेकर, नागपूर-विकास  ठाकरे, भंडारा गोंदिया -प्रशांत पडोळे, रामटेक - रश्मी बर्वे, गडचिरोली -नामदेव किरसान, नंदुरबार -गोवल के पाडवी, अमरावती -बलवंत वानखेडे, नांदेड  - वसंतराव चव्हाण, लातूर - शिवाजीराव काळगे


इतर महत्वाच्या बातम्या 


काँग्रेसचे महाराष्ट्रातील 7 उमेदवार जाहीर, सोलापुरातून प्रणिती शिंदे रिंगणात