Amravati lok Sabha : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतील नेत्यांना न कळवता, सांगली लोकसभा मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. त्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केल्याने नाराजी व्यक्त केली होती. शिवाय काही जागांचा वाद दिल्ली दरबारीही पोहोचला होता. दरम्यान, सांगलीच्या जागेचा वाद अद्याप शमलेला नसताना आता ठाकरे गटाने आणखी एका मतदारसंघात कुरघोडी केली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेला असतानाही ठाकरे गटाने मेळाव्यांना सुरुवात केली आहे. 


ठाकरे गटाचे दिनेश बुब बंडाच्या तयारीत?


काँग्रेस पक्षाने अमरावती लोकसभा मतदारसंघातून बलवंत वानखेडे यांना उमेदवारी घोषित केली आहे. दरम्यान याच मतदारसंघातून ठाकरे गटाने मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गट बंडाच्या तयारीत आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. ठाकरे गटाचे नेते दिनेश बुब या मतदारसंघातून तयारी करत होते. त्यांच्या तयारीमुळे आता चर्चेला उधाण आले आहे. अमरावतीमध्ये ठाकरे गटाचा पदाधिकारी मेळावा सुरु झालाय. अमरावती लोकसभेसाठी मविआतून काँग्रेसचे बळवंत वानखडे यांना उमेदवारी जाहीर होऊनही ठाकरे गट आग्रही आहे. अमरावती लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली आहे. 


महायुतीकडून नवनीत राणा मैदानात उतरण्याची शक्यता 


अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या भाजपकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. राणा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर निवडून आल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी लोकसभेत नेहमी पीएम मोदींच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. खासदार नवनीत राणा यांनी निवडून आल्यानंतर सातत्याने भाजपसाठी आक्रमक भूमिका मांडली. मात्र, उमेदवारी कोणाला मिळणार हे आमचा पार्लमेंटरी बोर्ड ठरवेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. 


नवनीत राणा विरुद्ध बळवंत वानखेडे लढत होण्याची शक्यता 


भाजपकडून अद्याप अमरावतीचा उमेदवार निश्चित झाला नसला तरीही या जागेवरुन नवनीत राणा कमळ चिन्हावर लढतील, हे जवळपास निश्चित झाले आहे. महायुतीमध्ये या जागेवरुन भाजप आणि शिंदे गटामध्ये रस्सीखेच सुरु आहे. मात्र, या जागेसाठी भारतीय जनता पक्ष आग्रही आहे. आज दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थित महायुतीची जागावाटपावर महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. त्यामुळे ही जागा कोणाच्या वाट्याला येणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : ठाकरे गटाचे नेते निवडणुकीत आपल्याला मदत करतील, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा दावा