मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्री नितेश राणे यांनी केरळ राज्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली आहे. नितेश राणे यांनी काल सासवडमध्ये बोलताना केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान असल्याचं म्हटलं होतं. यानंतर काँग्रेस नेत्यांनी नितेश राणे यांच्यावर टीका केली आहे. मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीनं सार्वजनिक रित्या बोलताना, वागताना भान बाळगलं पाहिजे पण नितेश राणेंनी सर्वच मर्यादा ओलांडल्याची टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. वर्षा गायकवाड यांनी नितेश राणे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.


बाळासाहेब थोरात काय म्हणाले?


बाळासाहेब थोरात यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे, त्यात म्हटलं की,केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक रित्या बोलताना, वागताना भान बाळगले पाहिजे पण नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत!


जितकी जास्त बाष्कळ बडबड तितकी जास्त प्रगती हे समीकरण भाजपमध्ये असल्याने मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा तारे तोडले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी किमान आपल्या सहकाऱ्याला समजूत द्यावी, ही भाषा, हे वर्तन योग्य नाही, मंत्र्यांनी आपल्या पदाचे ग्रहण करताना शपथ घेतली आहे याची तरी आठवण ठेवावी आणि समाजात तेढ वाढणार नाही असे वर्तन करू नये!, असं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले. 






मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा : खासदार वर्षा गायकवाड


काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, नितेश राणे यांनी केरळची पाकिस्तानशी केलेली तुलना आणि तिथल्या लोकांना दहशतवाद्यांशी जोडून केलेलं विधान हे अत्यंत अपमानास्पद आणि संतापजनक आहे. असं बेछूट वक्तव्य म्हणजे संविधानातील सिद्धांतांवर थेट हल्ला आहे. हा त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्या पदाच्या तत्वांशी केलेला विश्वासघात आहे. वर्षा गायकवाड यांनी नितेश राणेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील केली. वर्षा गायकवाड म्हणाल्या भाजपनं उत्तर द्यावं : नितेश राणे यांच्या द्वेषपूर्ण वक्तव्यांचा ते समर्थन करतात का? या असंविधानिक वक्तव्यांसाठी मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.


नितेश राणे काय म्हणाले होते?


"केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान आहे. म्हणूनच राहुल गांधी आणि त्यांची बहीण तेथून निवडून येतात. सगळे अतिरेकीच त्यांना मतदान करत आहेत. मी खरं बोलतोय. अतिरेकींना हाताशी धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत," असं थेट विधान नितेश राणे यांनी सासवडमध्ये केलं होतं.  


इतर बातम्या :


'केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान', राहुल गांधींवर टीका करताना नितेश राणेंचं वादग्रस्त विधान!