Santosh Deshmukh Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचं अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरून मस्साजोगसह राज्यातील नागरिकांनी आणि नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे निकटवर्तीय असलेले वाल्मिक कराड (Walmik Karad) हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. शनिवारी बीड येथे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चातून धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली. या मोर्चात सहभागी झालेले औसा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar) यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आहे. अभिमन्यू पवार यांनी बीड आक्रोश मोर्चाची जनभावना देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घातली आहे.
अभिमन्यू पवार यांनी 'एक्स'वर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीचा फोटो शेअर करत म्हटले आहे की, आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन बीड आक्रोश मोर्चाची जनभावना त्यांच्या कानावर घातली. परवा मी बीड येथील आक्रोश मोर्चात सहभागी होऊन मोर्चातील सहभागींची जनभावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्याचा शब्द दिला होता. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली. बीड येथील निर्घृणपणे हत्या करण्यात आलेले दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकीच्या हाकेवरुन निघालेल्या आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या जनसामान्यांची जनभावना त्यांच्या कानावर घातली. या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री स्वतः अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणी गुन्हेगारांची बँक खाती गोठवण्याची आणि संपत्ती जप्त करण्याची कारवाई सुरू आहे, उर्वरित फरार आरोपींची युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू असून त्यांनाही लवकरच अटक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्याची माहिती अभिमन्यू पवार यांनी दिली आहे.
रामदास आठवलेंनी घेतली देशमुख कुटुंबियांची भेट
दरम्यान, आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले म्हणाले की, मी या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस उलटले असले तरी आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. ही फार गंभीर बाब आहे. तर या प्रकरणातील सोनवणे यांनी तक्रार केल्यानंतर 6 तारखेला गुन्हा दाखल झाला असता तर आज ही वेळ आली नसती, असे त्यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा