मुंबई: गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या मुंबईतील संघटनेला घरघर लागल्याचे चित्र आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी, संजय निरुपम आणि अशोक चव्हाण या तीन बड्या नेत्यांनी काँग्रेसची (Congress) साथ सोडली होती. यापैकी देवरा, सिद्दीकी आणि संजय निरुपम यांची पक्षातील एक्झिट मुंबई काँग्रेससाठी चिंताजनक मानली जात होती. हे तिघेही नेते काँग्रेस पक्षाचा मुंबईतील चेहरा म्हणून ओळखले जात होते. या धक्क्यातून संघटना सावरत नाही तोच आता मुंबई काँग्रेसच्या वर्तुळातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असणारे नसीम खान (Naseem Khan) हेदेखील हायकमांडवर प्रचंड नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.
नसीम खान हे उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छूक होते. मात्र, याठिकाणी काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नसीन खान हे प्रचंड नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भरात असताना नसीम खान यांनी पक्षाच्या प्रचार समिती आणि स्टार प्रचारकपदाचा राजीनामा दिला आहे. नसीम खान यांनी हा राजीनामा थेट हायकमांडला पाठवला आहे.
नसीम खान यांनी काँग्रेस हायकमांडला स्पष्ट सांगितलं, म्हणाले...
नसीम खान यांनी प्रसारमाध्यमांसमोर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाने मला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्र येथे पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याची जबाबदारी दिली होती. तीदेखील मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडली. तीन महिन्यांपूर्वी पक्षाने मला उत्तर-मध्य मुंबईतून निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिले होते. तुम्ही माजी खासदार, मंत्री आणि ज्येष्ठ नेते आहात. त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणूक लढवा, असे मला पक्षाकडून सांगण्यात आले होते. मी पक्षाचा आदेश मानून लगेच तयारी सुरु केली होती. मात्र, आता या जागेवरुन वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार उभा केलेला नाही. मुस्लिमांची मतं हवीत पण मुस्लीम उमेदवार नको, असे कसे चालू शकते? उत्तर-मध्य मुंबईतून उमेदवारी नाकारली गेल्यानंतर आता मी मुस्लीम समाजासमोर कोणत्या तोंडाने जायचे? काँग्रेस पक्षाच्या या निर्णयावर मुस्लीम समाज नाराज आहे, मीदेखील नाराज आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो. शेवटी मी पक्षाचा ज्येष्ठ नेता आहे, असे नसीम खान यांनी म्हटले.
आणखी वाचा
वर्षा गायकवाडांना उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य, नसीम खान म्हणाले...