Devendra Fadnavis: विरोधकांच्या हाती आयतं कोलीत देऊ नका; देवेंद्र फडणवीसांची वाचाळवीर आमदारांना सक्त ताकीद
Devendra Fadnavis in Mumbai: देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील सर्व आमदार आणि मंत्र्यांना बुधवारी रात्री झालेल्या कार्यक्रमात एक महत्त्वाची सूचना दिली आहे.

Devendra Fadnavis hosting dinner party in Mumbai: महायुतीमध्ये वाद होईल, असे कोणतेही वक्तव्य करु नका. एखादे वादग्रस्त वक्तव्य करुन पावसाळी अधिवेशनात विरोधकांच्या हाती आयते कोलीत देऊ नका, अशी सक्त ताकीद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महायुतीमधील (Mahayuti) वाचाळवीर आमदारांना दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुंबईतील वर्षा या निवासस्थानी बुधवारी रात्री महायुतीच्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थित आमदार आणि मंत्र्यांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या छोटेखानी भाषणात भाजपच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना अधिवेशनाच्या काळात सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. गेल्या काही दिवसांमध्ये महायुतीमधील काही आमदार विविध मुद्द्यांवरुन एकमेकांवर दुगाण्या झाडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आणि महायुतीच्या आमदारांना, 'महायुतीत वाद होतील, अशी वक्तव्य टाळा', अशी स्पष्ट सूचना सर्वांना दिली. तसेच वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांनाही वरिष्ठांकडून सूचना देण्यात आल्याचे समजते. महायुतीच्या या डिनर डिप्लोमसी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या तयारीला लागण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
तसेच सर्व आमदारांनी सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहावे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व आमदारांनी अधिक सक्रिय राहावे. आपल्या मतदारसंघात जनतेशी संपर्कात राहून कार्य करावे. सोशल मीडियाचा प्रभाव लक्षात घेता, सर्वांनी सोशल मीडियावर अधिक प्रभावीपणे सक्रिय राहावे, अशा सूचना महायुतीच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना देण्यात आल्या. दरम्यान, गुरुवारी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे. आतापर्यंत विरोधकांना सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यात विशेष यश मिळालेले नाही. मात्र, पावसाळी अधिवेशनाच्या आगामी दिवसांमध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जोरदार जुंपण्याची शक्यता आहे.
Mahayuti Meeting: महायुती समन्वय समितीच्या बैठकीत ठरली विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी रणनीती
शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांच्या शासकीय निवासस्थानी बुधवारी महायुती समन्वय समितीची बैठक संपन्न झाली. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण, शंभुराज देसाई, उदय सामंत, सुनील तटकरे व हसन मुश्रीफ उपस्थित होते. या बैठकीत ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. या विजयी मेळाव्याची पोलखोल करण्यासाठी महायुतीकडून रणनीती आखण्यात आल्याचे समजते.
आणखी वाचा
अखेर मंत्र्यांना मर्जीतले खासगी सचिव नाहीच! दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतरही पदरी निराशाच























