मुंबई: तुम्ही राज्यातील ज्येष्ठ नेते आहात. प्रत्येक गावात आणि जिल्ह्यात समाज घटकांची नेमकी काय परिस्थिती आहे, याचा अभ्यास तुम्हाला जास्त आहे. आम्ही मंत्री झालो किंवा मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) झालो म्हणजे आमचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त नाही. त्यामुळे तुम्ही आरक्षणासंदर्भातील बैठकीला आले पाहिजे, अशा शब्दांत राज्य सरकारमधील ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार (Chhagan Bhujbal) यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. छगन भुजबळ यांनी सोमवारी सकाळी अचानकपणे मुंबईतील सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवार यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीचा संपूर्ण वृत्तांत प्रसारमाध्यमांना सांगितला.


आरक्षणाच्या प्रश्नावर राज्य सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीयांच्या बैठकीला तुम्ही यायला पाहिजे होते, असे मी त्यांना सांगितले. यावर शरद पवार यांनी म्हटले की, आरक्षणासंदर्भात सरकारची भूमिका आम्हाला माहिती नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे यांच्याशी काय बोलले, त्यांना काय आश्वासनं दिली, हे आम्हाला माहिती नाही. तसेच तुम्ही लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांचे उपोषण सोडवताना काय बोललात, याचीही आम्हाला कल्पना नाही. त्यामुळे आम्ही बैठकीला आलो नाही, असे शरद पवार यांनी म्हटल्याचे भुजबळ यांनी सांगितले.


त्यावर मी शरद पवार यांना आरक्षणासंदर्भात झालेल्या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांनी मांडलेल्या भूमिकेची माहिती दिली. माझे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी , 'मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करेन, असे म्हटले. आम्ही दोनचार लोक एकत्रं बसू. आरक्षणाबाबत काय होतंय, काय केलं पाहिजे, यावर आम्ही चर्चा करु. मी आरक्षणाची समस्या सोडवायला तयार आहे. पण सध्या माझी तब्येत बरी नाही. पण दोन दिवसांत आपण यावर चर्चा करू, असा शब्द शरद पवार यांनी दिल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.


राज्यातील परिस्थिती स्फोटक, ज्येष्ठ नेते म्हणून राज्यात शांतता निर्माण करण्याची जबाबदारी तुमची, छगन भुजबळांचं पवारांना आवाहन


या भेटीवेळी छगन भुजबळ यांनी शरद पवारांना आरक्षण प्रश्नात लक्ष घालण्यासाठी वारंवार गळ घातली. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. काही लोक मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये जात नाहीत. ओबीसी, धनगर, वंजारी हे मराठा समाजाच्या दुकानात जात नाहीत. महाराष्ट्रात अशी सगळी परिस्थितीत असताना एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे की, राज्यात शांतता निर्माण झाली पाहिजे, असे मी शरद पवारांना सांगितल्याचे भुजबळ यांनी म्हटले. 


मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देताना अशीच स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा सरकारचं काय होईल, ते होईल, पण हा निर्णय झाला पाहिजे, अशी भूमिका घेत, तुम्ही निर्णय रेटला. आजही तशीच परिस्थिती आहे, असे भुजबळ यांनी पवारांना सांगितले.


VIDEO: छगन भुजबळ आणि शरद पवारांची नेमकी काय चर्चा झाली?



आणखी वाचा


शरद पवार यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ वेटिंगवर, भेट घेऊनच परतणार, भुजबळांचा पवित्रा