मुंबई: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास ठामपणे विरोध करणारे अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे सोमवारी सकाळी अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी पोहोचले. काहीवेळापूर्वीच मुंबईतील सिल्व्हर ओकवर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा ताफा दाखल झाला. आता ते शरद पवार यांच्याशी नेमकं काय बोलणार? त्यांची ही भेट नेमकी कशासाठी आहे? याचा अद्याप उलगडा होऊ शकलेला नाही. मात्र, राज्यातील सध्या धुमसत असलेल्या मराठा-ओबीसी आरक्षणप्रश्नाच्या अनुषंगाने शरद पवार आणि छगन भुजबळ यांची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.


कालच छगन भुजबळ यांनी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शरद पवार यांच्या सांगण्यावरुनच विरोधी पक्षाचे नेते आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, असा आरोपच भुजबळ यांनी केला होता. आरक्षणाचे भांडण मिटावं म्हणून सरकारने नुकतीच सह्याद्रीला एक सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी येऊन मार्गदर्शन करावे, सगळं प्रकरण कसं शांत होईल. सगळ्यांना न्याय मिळण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी विरोधी पक्षनेत्यांनी येणे क्रमप्राप्त होते. मी विजय वडेट्टीवार यांना सांगितलं होते. जितेंद्र आव्हाड यांनासुद्धा बोललो होतो. त्यांना सांगितलं की शरद पवार यांनासुद्धा बोलवा. कारण व्ही. पी. सिंग यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी साहेबांनी केली. त्यामुळे आतापर्यंत आम्ही साहेबांचा जयजयकार केला. मात्र, आता आरक्षणाचा प्रश्न पुन्हा निर्माण झालेला असताना अपेक्षा ही होती की, महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी तिथे यायला हवं होतं. मात्र असं सांगितलं जातं की या बैठकीला सर्व नेते येणार होते, पण सायंकाळी पाच वाजता बारामतीतून कोणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला, असे छगन भुजबळ यांनी सांगितले होते. त्यांच्या या टीकेचा रोख शरद पवार यांच्या दिशेने असल्याची चर्चा आहे.


छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा


छगन भुजबळ हे अजितदादा गटाने वेगळा राजकीय संसार थाटल्यापासून पहिल्यांदाच शरद पवार यांना भेटत आहेत. अजितदादा गटात गेल्यापासून छगन भुजबळ यांनी आतापर्यंत शरद पवार यांच्यावर अनेकदा टीका केली आहे. मात्र, गेल्या काही काळापासून छगन भुजबळ हे अजितदादा गटात फारसे खुश नसल्याची चर्चा आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ते पक्षात एकटे पडल्याची कुजबूज आहे. त्यामुळे छगन भुजबळ पक्षांतर करतील, अशीही कुजबुज मध्यंतरी सुरु होती. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.  मात्र, राज्यभरात छगन भुजबळ यांची मराठा आरक्षणविरोधी अशी प्रतिमा तयार झाली आहे. मनोज जरांगे पाटील हे भुजबळांना सातत्याने लक्ष्य करतात. त्यामुळे छगन भुजबळ यांच्यासाठी कोणता पक्ष दरवाजे उघडणार,याबाबत साशंकताच आहे.


आणखी वाचा


छगन भुजबळ अचानक शरद पवारांच्या भेटीला, राजकीय वर्तुळात खळबळ अजितदादा गटाची पहिली प्रतिक्रिया