मुंबई: मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन कालच (14 जुलै) शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सोमवारी सकाळी अचानकपणे शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओक (Silver oak) येथे पोहोचले. छगन भुजबळ यांच्या या कृतीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. छगन भुजबळ अचानक शरद पवार यांना भेटायला का आले, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे या भेटीबाबत अनेकांची उत्सुकता वाढली आहे.
....तरी शरद पवार यांनी दिली भेटीची वेळ
गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणामुळे चर्चेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांची तब्येत ठिक नाहीये. ते कोणाचीही भेट घेत नाहीयेत. तरीदेखील भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी भुजबळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाणार आहेत, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहे, असे भुजबळ म्हणाले होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस तर नाही ना? असे आता विचारले जात आहे.
काल टीका, आज भेट, चर्चांना उधाण
छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आपल्या या भाषणानंतर आज भुजबळ हे शरद पवार यांची भेट घेण्यासाठी सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. भुजबळ यांच्या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या भेटीमागचे नेमके कारण काय? असे विचारले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून भुजबळ नाराज असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर आता छगन भुजबळ हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत.
भुजबळ यांची भेट गुप्त ठेवण्याचा प्रयत्न (Chhagan Bhujbal Sharad Pawar Meeting Update)
छगन भुजबळ आणि शरद पवार यांची भेट ही गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण आता छगन भुजबळ यांचा संपूर्ण ताफा सिल्हर ओकवर पोहोचला आहे. भुजबळ यांच्या या अचानक भेटीनंतर आता अजित पवार यांच्यात काय पडसाद उमटणार? असे विचारले जात आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे कामाला लागले होते. विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या गटाने आतापासूनच तयारी चालू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांची बारामतीत एक मोठी सभा पार पडली. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी छगन भुजबळ सिल्वहर ओकवर पोहोचले आहेत. सिल्व्हर ओकवर अनेक गाड्या पोहोचल्या आहेत.
महाराष्ट्र पेटवण्याचं कम केालं जातय- भुजबळ
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची 14 जुलै रोजी जाहीर सभा झाली होती. या सभेत छगन भुजबळ जोरदार भाषण केले होते. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राज्यातले एक ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचं सोडून विरोधी पक्षांना काहीही सल्ले दिले जात आहेत. आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम काही लोक करत आहेत, असे छगन भुजबळ यांनी म्हटले होते.
आरक्षणाच्या मुद्द्यावरही भुजबळ यांचे भाष्य
आरक्षणाचा इतका महत्त्वाचा प्रश्न राज्यात आहे. त्यावेळी ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही तो प्रश्न सोडवला पाहिजे. तुमचं वैर या छगन भुजबळशी असेल किंवा अजित पवारांशी असेल ओबीसी समाजाने तुमचं काय घोडं मारलं आहे? हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्याबरोबर का येत नाही? विरोधी पक्षाचे नेते बैठकीला येणार होते त्यांना बारामतीतून फोन गेला म्हणून ते आले नाहीत, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले होते.