Chandrashekhar Bawankule : पंतप्रधान मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची जळजळीत टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही, अशा तिखट शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांनी मोदींवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाची कास सोडली आणि काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, ते उद्धव ठाकरे आज हिंदूंच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत. उद्धव ठाकरे तुमचं हिंदू प्रेम किती बेगडी होतं हे तुमच्या अडीच वर्षांच्या सत्तेच्या काळात जनतेनं बघितलं. पालघरमध्ये झालेलं साधूंचं हत्याकांड आणि तुमची हिंदूविरोधी भूमिका महाराष्ट्रानं बघितली. बांगलादेशमधील हिंदूच्या पाठीशी भाजप उभी आहे. त्याचसाठी केंद्र सरकारनं 'नागरिकत्व दुरूस्ती विधेयक' मंजूर केलं. त्यावेळी तुम्ही मात्र काँग्रेसला घाबरून राज्यसभेत बोटचेपी भूमिका घेतली होती. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची औकात नाही, अशा तिखट शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक पवित्रा घेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
यातून तुमची तथाकथित हिंदुत्ववादी निष्ठा समजते
भाजपासाठी हिंदुत्ववाद हा राजकारणाचा विषय नाही, तर ती आमची श्रध्दा, प्राण आणि श्वास आहे. ज्यांनी सत्तेसाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे प्रखर हिंदुत्ववादी विचार सोडले. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांचे चिरंजीव प्रियांक खरगे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेली टीका, तसेच कर्नाटक विधानसभेतून सावरकरांची प्रतिमा काढण्याचा काँग्रेस नेते उद्दामपणा करता तुम्ही अवाक्षर काढले नाही. यातूनच तुमची हिंदुत्ववादी तथाकथित निष्ठा समजते. तुम्हाला विश्वगुरू पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (PM Narendra Modi) यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाहीच पण तुमची ती लायकी देखील नाही. अशा प्रखर शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून घणाघाती टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले होते उद्धव ठाकरे
बांगलादेश अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू धर्मियांवर सातत्याने हल्ले (Bangladesh Violence) होत आहेत. यामुळे बांगलादेशमधील हिंदूसह संपूर्ण जगभरातील हिंदू धर्मीय चिंतेत आहेत. महाराष्ट्रात बांगलादेशच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपवर घणाघात केलाय.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या देशाच्या संसदेचं अधिवेशन सुरु आहे. हे अधिवेशन किती सुरळीत सुरु आहे हे आपण पाहतोय. महत्वाचे विषय सोडून इतर विषयाला महत्व दिलं जातंय. बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले होत आहेत. आपण बांगलादेशसोबत क्रिकेट खेळणं कितपत योग्य आहे? बांगलादेशमध्ये इस्कॉनच्या प्रमुखाला अटक झाली, तिथे हिंदूंवर अन्याय होताय. विश्वगुरु शांत का आहेत? नरेंद्र मोदी यावर काय करणार आहेत? तुम्ही युक्रेनचा युद्ध थांबवल होतं. मग केंद्र सरकार यावर काय करणार आहे? तुम्ही काय पाऊल उचलणार आहात? असे सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
आणखी वाचा