Chandrashekhar Bawankule : सुधीर मुनगंटीवारांकडून पक्षाला घराचा आहेर, चंद्रपुरातील पराभवानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया म्हणाले, थेट संबंध नाही..
सुधीर मुनगंटीवारांकडून पक्षाला घराचा आहेर, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया; म्हणाले, पक्ष नेतृत्वाने नेहमीच शक्ती दिली आणि पुढेही देतील, पण....

Chandrashekhar Bawankule नागपूर : चंद्रपुरात जे घडलं त्याची नक्कीच आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे. मात्र सुधीर मुनगंटीवार चंद्रपूरमधील पराभवाचा संबंध मंत्रीपदाशी जोडत असले, आणि त्यांची भावना योग्य असली, तरी मंत्रिपद नसणे आणि पराभव होणे असा थेट संबंध नाही. चंद्रपूर बद्दल नक्कीच आत्मविश्लेषण करू. वेळ आली तर सुधीर मनगंटीवार यांच्यासोबतही बोलू. अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूलमंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलीय.
राज्यभरात झालेल्या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये महायुतीचा गाजावाजा असताना चंद्रपूरमध्ये (Chandrapur Election Result) मात्र, भाजपला मोठं नुकसान झाल्याचं दिसून आलं. चंद्रपुरातील 11 पैकी आठ ठिकाणी काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आलेत, तर भाजपला अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. या पराभवानंतर पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मात्र थेट पक्षाच्या नेतृत्वावर टीका केली. काँग्रेसने त्यांच्या नेत्यांना शक्ती दिली, तर आमच्या पक्षाने माझी शक्ती कमी केली, असं वक्तव्य मुनगंटीवारांनी केलं. त्यामुळे मुनगंटीवारांनी नाव न घेता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधल्याचं दिसून आलं. अशातच आता भाजपकडून या नाराजीवर पहिली प्रतिकिया आली आहे.
Chandrashekhar Bawankule : पक्ष नेतृत्वाने नेहमीच मुनगंटीवार यांना शक्ती दिली आणि पुढेही देतील
मुख्यमंत्री आणि पक्ष नेतृत्वाने नेहमीच मुनगंटीवार यांना शक्ती दिली आहे, आणि पुढेही देतील. असेही सुधीर मुनगंटीवार म्हणाले. एकनाथ शिंदे यांचा परफॉर्मन्स नक्कीच उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा दहा पटीने जास्त आहे. मी तीस वर्षापासून महायुतीत निवडणूक लढवत आहे. शिंदे जसा परफॉर्मन्स देत आहे, तसंच उद्धव ठाकरे आमच्या सोबत असताना कधीच परफॉर्मन्स करू शकले नाही. अजित पवार यांच्यासोबत काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही. मात्र, अजित पवार यांच्याशी काही ठिकाणी युती न होण्याचा कारण मुस्लिम मतांचा विभाजन करण्याचा उद्देश नाही. तर कार्यकर्त्यांच्या हितासाठी तसं होईल. अशी माहितीही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिलीय.
Chandrashekhar Bawankule on Shivsena : शिवसेनेसोबत सर्व 29 ठिकाणी युतीसाठीची बोलणी सुरू
महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत सर्व 29 ठिकाणी युतीसाठीची बोलणी सुरू आहे. सर्व ठिकाणी युती होईल आणि लवकरच घोषणा होईल. संजय राऊत एकनाथ शिंदेंना धनुष्यबाण सोडण्यासाठी कसं बोलू शकतात. त्यांना काय अधिकार आहे? धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना संविधानाने दिलेला आहे. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.























