पुणे :  अजित पवारांना (Ajit Pawar)  महायुतीतून (Mahayuti)  काढा, या भाजप पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यांतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सुदर्शन चौधरी यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कार्यालयासमोर अजित पवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर पुणे भाजपचे नेते सुदर्शन चौधरी यांनी  दिलगिरी व्यक्त केली आहे. माझ्या वक्तव्यामुळे अजितदादांच्या किंवा तुमच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे चौधरी म्हणाले. राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे, असेही ते म्हणाले. 


भाजपचे नेते सुदर्शन चौधरी यांनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह बातचित केली.  अजित पवार युतीत नको,  ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. ती मी बोलून दाखवली आहे.  मात्र आता मला पक्षाने गप्प राहायला सांगितले आहे. राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे. अजित पवारांसोबतची युती मतदारांनी नाकारली आहे.  हे लोकसभा निवडणुकीतील मतदानातून दिसून आले आहे.  अजित पवारांचा आणि माझा वैयक्तिक वाद नाही. माझी त्यांची ओळख देखील नाही. अजित पवार नकोत ही केवळ माझीच नाही तर अनेक भाजप कार्यकर्त्यांची भावना आहे असं चौधरी म्हणाले. राष्ट्रवादी हा गुंडांचा पक्ष आहे अशी टीकाही त्यांनी केलीय.


अजित पवारांबाबतचे ते वक्तव्य व्यक्तिगत 


 अजित पवारांना बाहेर काढा या माझ्या व्यक्तिगत भावना आहेत. मी अजित पवारांबद्दल चुकीची वक्तव्य केले नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल माझ्या वक्तव्यामुळे अजितदादांच्या किंवा इतरांच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो.  ते माझं वैयक्तिक मत होतं, असे सुदर्शन चौधरी म्हणाले.  


राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक


भाजप आमदार राहुल कुल यांच्यासमोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये खदखद बोलून दाखवली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अजित पवारांना महायुतीतून काढा, या भाजप पदाधिकाऱ्याच्या वक्तव्यांतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. सुदर्शन चौधरी यांच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कार्यालयासमोर अजित पवारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. एका युतीमध्ये राहून असं वक्तव्य करणं योग्य नाही, आमच्या नेत्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही अशी भावना या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली. काही वेळानं या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.  


हे ही वाचा :


NCP : अजितदादांचे आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर? पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट