मुंबई :  पावसाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस प्रचंड गाजतोय. याचं कारण ठरतेय दोन बड्या नेत्यांची भेट. हे दोन नेते आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) . विधानभवनाच्या लिफ्टमध्ये हे दोन नेते योगायोगानं एकत्र आले. परिस्थिती ओळखून दोघंही एकमेकांशी सौहार्दानं बोलले. मात्र राजकीय वर्तुळात आणि तज्ज्ञांमध्ये लगेचच चर्चांना उधाण आले आहे. आता या भेटनंतर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. त्यांची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत (मंत्रालयाचा सहावा मजल्यावर मुख्यमंत्र्यांचे दालन आहे) पोहचू शकत नाही, असा टोला लगावला आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 


विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर आल्या आहेत, महायुती आणि मविआतलं जागावाटप अजून व्हायचं आहे.   लोकसभेत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर योयायोगानं झालेल्या या भेटीला प्रचंड महत्त्व आलं आहे. त्यावर   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,  लिफ्ट मागितली तरी ती लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहचू शकत नाही. दोन वर्षापूर्वी ते काँग्रेसच्या लिफ्टमध्ये शिफ्ट झाल्याने आम्ही जनतेच्या लिफ्टमध्ये आलो. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले. लिफ्टमध्ये गेल्याने ते  युतीत  येणार आहे असे होत नाही.  


अधिवेशन निरोपाचे नाही तर निर्धाराचे : मुख्यमंत्री


खोके सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे अधिवेशन निरोपाचे नाही तर निर्धाराचे आहे.  निरोप कोण कोणाला देईल ते जनता ठरवेल. 


लंडनमधल्या पंचताराकीत हॉटेलपेक्षा पंचतारांकीत शेत केव्हाही बरी : मुख्यमंत्री


मुख्यमंत्र्यांची फाईव्हस्टार शेती, अमावस्या-पौर्णिमेला वेगळं काहीतरी पीक काढतात, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,  लंडनमधल्या पंचताराकीत हॉटेलपेक्षा पंचतारांकीत शेती केव्हाही बरी आहे. शेतकऱ्याने  पंचतारांकीतकरू नये का? चांगली नगदी पिके घेऊ नये का? स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फ्रुट लावू नये का? त्यांच्याच डोक्यात अमावस्या पौर्णिमा आहे. ते लिंबू मिरचीवाले आहेत. माझ्याकडे सर्व प्रकारची फळे आहेत. 


शेतकऱ्यांचे दु:ख समजण्यासाठी चिखल तुडवावा लागतो, घरात बसून काम होत नाही: मुख्यमंत्री


शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे आम्ही आहोत. त्यांनी बांद्रा ते बांधा कधी पाहिले नाही. त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख   कसे कळणार? त्यासाठी शेतात जावे लागते,चिखल तुडवावा लागतो. घरात बसून कसे कळणार आहे. शेतीच्या बाबतीत वर्क फ्रॉम होम चालत नाही. तिथे वर्क फ्रॉम फिल्ड चालते.


अजित पवारांच्या नाराजीवर मुख्यमंत्री म्हणाले....


महायुतीत अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा आहे. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी थेट उत्तर दिले नाही. मुख्यमंत्री म्हणाले,  आमचे महायुतीचे काम व्यवस्थीत सुरू आहे. महायुती मजबुतीने काम करत आहे. महाविकास आघाडीबद्दल विचारु नका, आमचे काम व्यवस्थीत सुरू आहे. 


Video : ठाकरे आणि फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीवरुन मुख्यमंत्री शिंदेंची कोपरखळी



हे ही वाचा :


Sushma Andhare: "विषय संपला", ठाकरे-फडणवीस भेटीवर सुषमा अंधारेंची मोठी प्रतिक्रिया!