(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंकजा मुंडे बीडमधून लोकसभेच्या रिंगणात? भाजपमध्ये अंतर्गत खलबतं
Pankaja Munde, Beed Lok Sabha constituency : माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) बीड लोकसभा मतदारसंघातून मैदानात (Beed Lok Sabha) उतरण्याची शक्यता आहे.
Pankaja Munde, Beed Lok Sabha constituency : माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) बीड लोकसभा मतदारसंघातून मैदानात (Beed Lok Sabha) उतरण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये याबाबत अंतर्गत खलबतं झाल्यानंतर याबाबतचा निर्णय झाल्याचं समजतेय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं दुसऱ्या पद्धतीनं राजकीय पुनर्वसन केले जाण्याची शक्यता आहे. 2014 मधील पोटनिवडणूक आणि 2019 मधील सार्वत्रिक निवडणुकीत प्रतीम मुंडे यांनी विजय मिळवला होता. यंदा बीडमधून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी अलिकडेच बीड लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. ‘मजबुरीने नको तर मला मजबुतीने काम हवे आहे’ , असे त्यांनी नुकतेच मतदारांना आव्हान केलं. म्हणजे, यातील ‘ मला’ या शब्दावरुन तसेच या लोकसभा मतदारसंघाची बांधणीत अनेक सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची उपस्थिती आता त्या ‘अग्रेसर’ बनल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये एका घरात दोन उमेदवाऱ्या मिळण्याची शक्यता कमी असल्याने बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जात आहे. पंकजा मुंडे यांचं नाव निश्चित झाल्याच्या राजकीय चर्चेला जोर धरला आहे.
परिस्थिती बदलली -
2014 आणि 2019 मध्ये प्रीतम मुंडे यांनी बीड लोकसभा मतदारसंघात विजय मिळवला होता. त्यावेळी बंधू धनजंय मुंडे यांनी त्यांच्याविरोधात प्रचार केला होता. पण यावेळची परिस्थिती वेगळी आहे. धनंजय मुंडे यावेळी बीडमध्ये भाजपच्या प्रचारात दिसतील. कारण, अजित पवारांनी भाजपसोबत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बीडमध्ये महायुतीची उमेदवार निवडून येण्याची शक्यता दाट आहे.
दुरावा कमी -
मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष आणि दुरावा कमी झाला आहे. मुंडे भगिनीपैकी कोणताही उमेदवार असला तरी आपण पाठीशी भक्कमपणे उभे राहू, असा शब्द धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. त्यामुळे बीडमधील भाजप उमेदवाराच्या पाठीशी यावेळी धनंजय मुंडे यांचेही पाठबळ असेल.
6 जणांची समिती -
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रधेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आणि आशिष शेलार यांची समिती महाराष्ट्रासाठी केंद्रीय भाजपनं नेमली आहे. या सहा जणांच्या समितीकडे संभाव्य उमेदवार निवडण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या समितीच्या आतापर्यंत दोन बैठका पार पडल्याचं समजतेय. त्यामध्ये काही जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचेही समजतेय.