नवी दिल्ली : लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. तर, विरोधी पक्षांकडून के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. नरेंद्र मोदी यांनी मांडलेला ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव आवाजी मतदानानं स्वीकारण्यात आल्याची घोषणा हंगामी अध्यक्ष बर्तृहारी महताब यांनी केली. यानुसार 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांनी  ओम बिर्ला यांना अध्यक्षपदाच्या आसनापर्यंत पोहोचवलं.

  


लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीएकडून ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांचं नाव अध्यक्षपदासाठी मांडलं.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सत्ताधारी एनडीएच्या 13  घटक पक्षांनी देखील प्रस्ताव मांडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, ललन सिंह, अमित शाह, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, जीतनराम मांझी, कुमारस्वामी, चिराग पासवान,सुनील  तटकरे, अनुप्रिया पटेल, अन्नपूर्णा देवी  यांनी ओम बिर्ला यांच्या अर्जाला अनुमोदन दिलं. 


 के. सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मांडला. एन.के. प्रेमचंद्रन, पंकज चौधरी, तारिक अन्वर, सुप्रिया सुळे यांनी अनुमोदन दिलं. 


पाहा व्हिडीओ :



आवाजी मतदानानं निवड 


ओम बिर्ला आणि के. सुरेश यांचे प्रस्ताव सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून मांडण्यात आल्यानंतर हंगामी अध्यक्ष बर्तृहारी महताब यांनी आवाजी मतदान घेतलं. आवाजी मतदानानं  ओम बिर्ला यांची निवड करण्यात आल्याची घोषणा महताब यांनी केली. 


ओम बिर्ला हे राजस्थानातील कोटा लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. याशिवाय त्यांनी  17 व्या लोकसभेत देखील लोकसभा अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. हंगामी अध्यक्ष बतृहारी महताब यांनी ओम बिर्ला यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षाचे नेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं. यानंतर सर्व खासदारांनी देखील ओम बिर्ला यांचं  टाळ्या वाजवत अभिनंदन केलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी,  राहुल गांधी आणि किरेन रिजीजू यांनी ओम बिर्ला यांना त्यांच्या आसनापर्यंत पोहोचवलं. 


पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी ओम बिर्ला यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात 17 व्या लोकसभेत महत्त्वाचे निर्णय घेतले गेल्याची माहिती दिली. नव्या संसद भवनात ओम बिर्ला यांच्या कार्यकाळात कामकाज सुरु झाल्याचं म्हटलं. 


राहुल गांधी यांनी ओम बिर्ला यांचं दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलं. लोकसभा हे सभागृह देशातील जनतेचा आवाज मांडणार आहे. लोकसभा अध्यक्ष या आवाजाचे रक्षणकर्ते आहेत. यावेळी विरोधी पक्षांचं बळ वाढलेलं आहे. आम्ही विश्वासाच्या तत्त्वावर सहकार्य करु, असं राहुल गांधी म्हणाले. तुम्ही भारताच्या जनतेचा आवाज मांडण्याची संधी द्याल, अशी आशा आहे, असं राहुल गांधी म्हणाले. या निवडणुकीत जनतेनं विरोधी पक्षांवर संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी दिलीय, असं राहुल गंधी म्हणाले.  यानंतर अखिलेश यादव, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टीआर बालू यांनी ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं. 


संबंधित बातम्या : 


सुंभ जळलाय तरी पिळ कायम! संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल, तर राहुल गांधी विरोधी पक्षनेते हे शुभसंकेत


राज ठाकरेंनी महायुतीला पाठींबा देण्याचे आदेश नाही दिले, मग आम्हाला वाटतं त्याला मत देऊ : संदीप देशपांडे