Sandip Deshpande on Vidhan Parishad Election: मुंबई : विधानपरिषद निवडणुकीत (Legislative Council Elections 2024) महायुतीला (Mahayuti) पाठिंबा देण्याचा कुठलाही आदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिलेला नाही, असं वक्तव्य मनसे (MNS) नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी केलं आहे. संदीप देशपांडे यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चा सुरू झाल्या असून अनेकांच्या भुवया उंतावल्या आहेत. आज विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संदीप देशपांडे यांनी एबीपी माझाशी बातचित केली. त्यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. 


मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी विविध मतदान केंद्रावर सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. माहीममधील लॉस एंजलिस शाळेत संदीप देशपांडे यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना मुंबईचा महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात सुशिक्षित लोकांचे अनेक प्रश्न आहेत. या निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा कुठलाही आदेश राज ठाकरे यांनी दिलेला नाही. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला जे वाटेल, त्याला मतदान करू शकतं, असं संदीप देशपांडे म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी पाठिंबा देण्यासंदर्भात कुठलाही आदेश दिलेला नाही. त्यामुळे आम्ही आमच्या म्हणण्यांनुसार, आम्हाला वाटतं तसं मतदान करू, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत. 


भाजपच्या मनधरणीनंतर मनसेची विधान परिषद निवडणुकीतून माघार 


विधान परिषदेची रणधुमाळी सुरू झाल्यापासूनच मनसे आणि भाजप यांच्यात विधान परिषद निवडणुकीवरुन राजकीय नाट्याचा एक अंक रंगल्याचं पाहायला मिळालेलं. मनसेनं अचानक कोकण पदवीधरमधून आपल्या उमेदवाराची घोषणा केली. पक्षाच्या वतीनं अधिकृत पत्रक जारी करुन अभिजीत पानसेंना कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण, त्यानंतर मनसेच्या या खेळीनं भाजपची गोची झाल्याच्या चर्चांनी जोर धरला. त्याला कारणंही तसंच होतं. कोकण पदवीधर मतदारसंघ म्हणजे, भाजपचा पारंपारिक मतदारसंघ. त्या ठिकाणी राज ठाकरेंनी उमेदवार दिल्यानं मनसे आणि भाजप यांच्यात काहीतरी बिनसल्याचंही बोललं जाऊ लागलं. या चर्चांना पार्श्वभूमी म्हणजे, लोकसभेच मनसेनं महायुतीला दिलेला बिनशर्त पाठींबा. पण काही काळानंतर भाजपकडून मनसेची मनधरणी करण्यात आली. राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवरील संभाषणानंतर मनसेनं विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतली.