नागपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जागा वाटपांच्या चर्चेच्या फेऱ्या आहेत. महायुतीनं विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढू  मात्र मुख्यमंत्री कोण असेल हे निवडणुकीच्या निकालानंतर ठरवण्याचं सूत्र निश्चित केल्याची माहिती आहे. भाजपचे विधानपरिषदेचे आमदार परिणय फुके यांनी नागपूरमधील भव्य महानुभाव पंथीय संमेलन व श्रीपंचावतार उपहार सोहळा या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मंचावर उपस्थित होते.  


नागपुरातील चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्ताने महानुभाव पंथीय संमेलनात विधानपरिषद आमदार परिणय फुके बोलत होते.  फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आहे, तरी ते ही एवढा निधी महानुभाव पंथीयांच्या विविध विकास कामांना देतात. मग मुख्यमंत्री झाल्यावर ते किती निधी देणार, फडणवीस यांचं  महानुभाव पंथीयांवर प्रेम आहे. एक कोटी महानुभाव पंथीय राज्यात आहेत. या सर्वांनी फडणवीस यांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद दिला. तर फडणवीस जी मुख्यमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही, असे परिणय फुके म्हणाले.


चक्रधर स्वामींची कर्मभूमी महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस 


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. चक्रधर स्वामींचा जन्म जरी गुजरातचा असला तरी त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र होती. येथूनच त्यांनी महानुभाव पंथाला भारतात आणि भारताबाहेर अफगाणिस्तानपर्यंत नेले. त्यांच्या माध्यमातूनच महानुभाव पंथाची अतुलनीय ग्रंथसंपदा तयार झाली, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.  सर्व प्रकारच्या धर्मचर्चा मराठीतून व्हाव्यात हा आग्रह धरला. यामुळेच मराठीतील आद्यग्रंथ रिद्धपुरमध्ये महानुभाव पंथीयांमार्फत तयार झाला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी लागणारी ताकद यामुळे मिळाली. समाजाला सर्व मोहापासून मुक्त करून व्यसनमुक्त समाज घडवण्यासाठी महानुभव पंथाने दिलेले योगदान मोलाचे आहे. यासोबतच आपली संस्कृती, विचार आणि वाङ्मय जीवंत ठेवण्याचे काम महानुभाव पंथाने केले, असं देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 


दरम्यान, नागपूरमध्येही महानुभाव पंथाचे चांगले भवन निर्माण करण्यासाठी चिचभवन येथे जागा बघितली असून सर्व पूर्तता होत असल्यास येथे हे भवन लवकरच निर्माण करण्यात येईल. 800 वर्ष परकीय आक्रमकांपासून जी मंदिरे महानुभाव पंथीयांनी वाचवली आता त्यांचे संवर्धन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यात सरकार मागे पडणार नाही हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी दिला. 


इतर बातम्या :



Imtiaz Jaleel: मविआसोबतच्या युतीबाबत जलील यांचा गौप्यस्फोट; नेत्यांसोबत चर्चा झाल्याची कबुली पण...; स्टेजवर जागा देण्यावर निर्णय होत नसल्याचा दावा